मुंबई :  आज गणेश चतुर्थी ! गुलालाची उधळण करत आणि ढोल ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया… या जयघोषात घराघरात बाप्पाचे आगमन झाले. गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.   
गेली दोन वर्ष कोविड संसर्ग निर्बंधामुळे गणेश उत्सवावर मर्यादा होती मात्र निबंध हटवल्याने यंदाच्या वर्षी बाप्पाचे मोठा थाटामाटात वाजत गाजत आगमन झाले. पारंपरिक वाद्यांच्या साथीला, भजन आणि बँजो यांची साथ मिळाली. आगमन  मिरवणुकीत लहान थोर आबालवृद्धांपासून प्रत्येक जण मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहे. महाराष्ट्राच्या महाउत्सवाची आजपासून सुरुवात झाली. 
‘वर्षा’वर गणरायाची प्रतिष्ठापना 

 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानीदेखील गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. यावेळी एकनाथ शिंदेंसह खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. शिंदे कुटुंबाने सहकुटुंब गणरायांची आरती केली. ‘लाडक्या गणरायाचे स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया. त्यासाठी आपण सर्व एकजुटीने आणि कोणत्याही आव्हानाची तमा न बाळगता प्रयत्न करूया,’ असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपणं देखील आवश्यक आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासारख्या विषयांवर सार्वजनिक गणेश मंडळांनी भर देऊन जनजागृती करावी.आपल्या सर्वांच्या साक्षीनं महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा दृढ संकल्प केला असून त्याच्यापूर्तीसाठी आपल्या मनातलं आमचं सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!