ठाणे : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, आता गणेशमूर्तीवर कसबी कारागिरांचे हात फिरू लागले आहेत. गणेशमूर्ती सजवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. ठाण्यातील अनेक कारखान्यांत गणेशमूर्तीला अनेक रत्नांनी आणि अलंकारांनी सजवण्याचे काम सुरू झाले आहे. नवीन नक्षीकामांची इमिटेशन ज्वेलरी, तसेच चांदीच्या आभूषणांनी घरगुती गणेशमूर्तीसह सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्ती सजूनच मूर्तीशाळेतून रवाना होणार आहेत.
गेल्या काही वर्षांत सोन्या – चांदीच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे त्याला पर्याय म्हणून गणेशमूर्तीच्या सजावटीसाठी इमिटेशन ज्वेलरीचा वापर होत आहे. किरीट, त्रिशूल, हातातील कडे, कमरपट्टा, उत्तरी, भावलीवरील नक्षीकाम, तबक आदी प्रकारची आभूषणे आणि इमिटेशन ज्वेलरी वापरण्यात येत आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील मूर्तिकार सिद्धेश अरुण बोरीटकर यांच्या कारखान्यात गणेशमूर्तींना इमिटेशन ज्वेलरीने सजवण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारे साहित्य भायखळाच्या बाजारपेठेतून आणले जाते. गणेशमूर्तीच्या उंचीनुसार ज्वेलरी वापरली जात असून, त्यानुसारच कारागिरांची मानधन ठरते.
इमिटेशन ज्वेलरीमध्ये काम करणारे कारागिरही वेगळे असतात. एका दिवसामध्ये एक कारागीर साधारण सहा ते आठ गणेशमूर्तीना सजवण्याचे काम करतो. इमिटेशन ज्वेलरीने सजवलेल्या गणेशमूर्ती महाग जरी असल्या, तरी त्या आकर्षक असल्याने त्यांना मागणीही भरपूर आहे. यावर्षी इमिटेशन ज्वेलरीच्या गणेशमूर्तीच्या सुमारे 800 ते एक हजारच्या आसपास आर्डर आल्या असल्याची माहिती बोरीटकर यांनी दिली. यंदाही इमिटेशन ज्वेलरीने सजवलेल्या गणेशमूर्ती ठाण्यासह मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, राजस्थान आणि रत्नागिरीमध्ये रवाना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पेन्शन योजना सुरू करा !
राज्य सरकारने 60 वर्षांपुढील मूर्तिकारासाठी पेन्शन योजना सुरू करावी. गणेशमूर्ती घडवण्यासाठी रात्र दिवस मेहनत करावी लागते. त्यामुळे अनेक मूर्तिकाराची मुले या व्यवसायात उतरत नाही. त्यामुळे या व्यवसायात इतर भाषिकांचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
जागा सर्वांत मोठी समस्या
मूर्तिकारासाठी ‘जागा’ ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे सरकारने गणेशमूर्तीच्या कारखान्यांसाठी भूखंड भाडेतत्त्वावर द्यावेत, अशी मागणी ज्येष्ठ मूर्तिकार अरुण बोरीटकर यांनी केली. यंदा ठाणे पालिकेकडे महिन्यापूर्वीच गणेशमूर्ती घडवण्यासाठी जागेची मागणी केली; मात्र प्रशासनाने परवानगी नाकारल्याने मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.