कल्याण, दि.22 ; स्मार्ट सिटीची स्वप्न दाखवणा-या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विठ्ठलवाडी मोक्षधाममध्ये लाईटची व्यवस्था नसल्याने मृतांच्या नातेवाईकांना चक्क मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावं लागल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकाराबद्दल पालिका प्रशासनाच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये चीड व्यक्त होत आहे. हिच का तुमची स्मार्ट सिटी ? असा सवाल संतप्त नागरिकांमधून विचारला जात आहे.
महापालिकेच्या विठ्ठलवाडी मोक्षधाम मध्ये हा प्रकार घडलाय. गुरुवारी रात्री स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी एक मृतदेह आणण्यात आला. मात्र स्मशानभूमीत काळाकुट्ट अंधार पाहून नागरिक संतापले. यावेळी स्मशानभूमीत केवळ एकच कर्मचारी हजर होता. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांनी तिथल्या कर्मचा-याला स्मशानभूमीत लाईट का नाही असे विचारले, पण त्यालाही याची कोणतीच माहिती नव्हती. बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही लाईट आलीच नाही. अखेर मोबाइलच्या प्रकाशात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबद्दल पालिकेच्या कारभाराविषयी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान राष्ट्र कल्याण पक्षाचे सरचिटणीस राहुल काटकर यांनी महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांना स्मशानभूमीत तातडीने वीज आणि जनरेटर उपलब्ध करून देण्याची मागणी एका पत्राद्वारे केलीय