ठाणे, अविनाश उबाळे : ठाणे जिल्हा परिषदेच्या नवीन इमारत बांधकाम उभारणीसाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गुरुवारी मान्यता देण्यात आली आहे.सरकारकरकडून जिल्हा परिषदेच्या अद्यावत व सुसज्ज इमारतीसाठी असून ७३ कोटी २५ लाख ३७ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता तर ६२ कोटी ६४ लाख ६६ हजार १६३ रुपयांची तांत्रिक मान्यता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शासकीय कामकाजात जिल्हा परिषद ही महत्त्वाची मानली जाते मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेची इमारत भक्कम व सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असणं आवश्यक आहे. जिल्हा परिषद ठाणे येथील इमारत १९६५- ६६ साली बांधण्यात आली होती.मात्र मुख्य इमारत अतिधोकादायक झाल्याने मार्च २०१९ रोजी ही इमारत पाडण्यात आली.याच ठिकाणी नवी प्रशासकीय इमारत उभी करण्यासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ठाणे जिल्हापरिषदेने प्रस्ताव सादर केला होता ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा जिल्हा परिषदेच्या इमारत बांधकामाचा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता तथापि या प्रस्तावास गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रिमंडळाने राज्य शासनाची मंजुरी दिली.या इमारतीच्या बांधकाम उभारणीसाठी निधी मिळावा म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदाल, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष,व उपाध्यक्ष तसेच सदस्यांनी देखील मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता.दरम्यान शासकीय मंजूरी नंतर लवकर जिल्हा परिषदेच्या इमारत बांधकामासाठी निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचे २०१९ मध्ये स्थापत्यविषयक लेखापरीक्षण करण्यात आले. त्यात इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने नव्या इमारती संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविला.होता या प्रस्तावाला आता शासकीय मान्यता मिळाली आहे. या नव्या इमारती मध्ये सर्व विभाग एकत्रित समन्वयाने काम करू शकणार आहेत. त्यामुळे कामकाज सुरळीत चालू राहण्यास मदत होईल.
-नव्या इमारतीची वैशिष्ट्य
- तळमजला, ३ मजली पार्किंग व ८ मजली इमारत असेल.
- २०, १७३.२७ चौरस, मीटर क्षेत्रफळ
- प्रवेशद्वार व स्वतंत्र कमान
- प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र फर्निचरची व्यवस्था
- विद्युतिकरणाची कामे
- अंतर्गत रस्ते
- सुशोभीकरणाची कामे
- इमारतीच्या सभोवताली संरक्षक भिंतीचे काम.
- इमारतीत ५६३ दुचाकी व ५७ चार चाकी वाहनासाठी स्वतंत्र पार्किंग
- ठाणे महानगरपालिकेच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था
- अग्निशामक यंत्रणेसाठी २,००,००० लिटरची पाण्याची टाकी.
- अस्तित्वात ५४ गाळे धारकांसाठी इमारतीत विचार करण्यात आलेला आहे.
- सौर ऊर्जा नेट मीटर सिस्टिम
- परिसर विकसित करणे.
- अग्निशमन यंत्रणा सुविधा
- रेन वाँटर हार्वेस्टिंग
- स्ट्राँम वाँटर ड्रेन
- भुमिगत पाण्याची टाकी
- मलनिस्सारण प्रकल्प (STP)- सदर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा फ्लशिंग व बागकामासाठी पुनर्वापर करण्याची सोय.