कल्याण : केडीएमटीच्या बसमधून ज्येष्ठ नागरिकांना (६० वर्षांहून अधिक वय) मोफत प्रवास आणि महिलांना ५० टक्के प्रवास सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाने शक्रवारी घेतला. आजपासून (शनिवार १६ मार्च) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित म्हणजेच कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपुर महानगरपालिका आणि अंबरनाथ व कुळगाव-बदलापुर नगरपरिषद यांच्या एकत्रित सहभागामधून सदर क्षेत्राकरीता प्राधिकरण करुन, त्याठिकाणी सार्वजनिक वाहतुक सुरु करण्यासाठी कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (KMPML) या अभिनामाची कंपनी स्थापन करण्यास शासनाने दि. १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयान्वये मंजूरी दिली आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या धर्तीवर कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (KMPML) स्थापन करण्यात आले असून, गठीत संचालक मंडळाची पहिली बैठक आज दि . १५ मार्च २०२४ रोजी महापालिका आयुक्त तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्या अध्यक्षतेखाली (दूरदृश्य प्रणालीद्वारे) आयुक्त दालनात संपन्न झाली. या संचालक मंडळात वरील नमूद महानगरपालिका व नगरपरिषद यांचे महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त, मुख्याधिकारी, आरटीओ, एमएमआरडीए चे प्रतिनिधी, सीआयआरटी पुणेचे संचालक यांचा अंतर्भाव राहील.
आजच्या बैठकीस उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजिज शेख, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य, कुळगाव-बदलापुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे, अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत तसेच आरटीओ प्रतिनिधी कदम उपस्थित होते. सदर बैठकीत कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (KMPML) च्या संपूर्ण रचना व कार्यपध्दतीबाबत संचालक मंडळाला माहिती देण्यात आली व या मंडळामार्फत पुढील नियोजन व धोरणात्मक निर्णय घेणेबाबत निश्चित करण्यात आले.