माजी आमदार पांडुरंग बरोरा अखेर राष्ट्रवादीच्या गळाला
मुंबई (अविनाश उबाळे) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात शनिवारी मुंबई येथील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला.
शिंदे गटाचे कट्टर समर्थक असलेल्या बरोबर यांना शरद पवार यांनी आपल्या राजकीय खेळीने अखेर गळाला लावल्याने बरोरा यांच्या प्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाला हा मोठा राजकीय धक्का बसला आहे.
पुढील विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला शहापूर विधानसभेची निवडणुक जड जाणार असल्याचे संकेत या राजकीय घडामोडींमुळे दिसत आहेत.
शहापूर विधानसभेचे माजी आमदार पांडुरंग महादू बरोरा यांनी शिवसेना शिंदे गटाला रामराम ठोकून अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात जाहीर प्रवेश केल्याने बरोरांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशामुळे शहापूर विधानसभेची समीकरणे पुढील काळात बदलणार असून आणखी पक्ष प्रवेश व काही राजकीय घडामोडी समोर येतील असे एकंदरीत चित्र शहापुरात दिसत आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका देखील केव्हाही जाहीर होण्याची शक्यता असल्याने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या राजकीय घडामोडी व पक्षप्रवेश होण्यास आता सुरुवात झाली आहे.शिवसेना पक्ष फुटून त्यांचे दोन गट तयार झाले.यामध्ये एकनाथ शिंदे यांचा नवीन गट तयार झाला.
बरोरा हे देखील शिंदे गटात सामील झाले होते.शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून शहापूरात ओळख असलेले पांडुरंग बरोरा यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात शनिवारी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला ठाणे ग्रामीण भागात हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
बरोरा यांच्या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री जयंत पाटील,राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे,माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड, यांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.