मुख्यमंत्र्यांकडून ढुमणे कुटुंबीयांचे सांत्वन

मुंबई, दि. 21 : – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले. मृत ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे तसेच त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक ढुमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकाराबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मृत ढुमणे आणि त्यांच्या कुटुंबियाप्रति संवेदना प्रकट केली आहे. वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून ढुमणे यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र प्रगणना कार्यक्रमाअंतर्गत प्राण्यांच्या पाऊलखुणा नोंदवण्याच्या कार्यक्रमाला शनिवारी सुरुवात झाली. मात्र या शुभारंभाच्या दिवशीच महिला वनरक्षकावर हल्ला करून वाघिणीने त्यांना जागीच ठार केले. ही घटना कोलारा येथील कोअर झोनच्या कक्ष क्रमांक 97 मध्ये घडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!