ठाणे, दि. २७ (प्रतिनिधी) : `कोरोना’च्या आपत्तीचे संकट असतानाच, कोलशेत एअर फोर्सच्या तळापासून १०० मीटरपर्यंत बांधकामांना बंदीचा महापालिकेचा आदेश संभ्रम निर्माण करणारा आहे, असे मत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर एअर फोर्सच्या तळाजवळ इमारतींच्या परवानगीसाठी महापालिकेवर बड्या व्यक्तीचा दबाव आहे का? असा सवालही नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना पत्रान्वये विचारला आहे.
यापूर्वीही कोलशेत हवाई दलाच्या तळाजवळ बांधकामांना परवानगी दिली जात नव्हती. मात्र, काही वर्षांपूर्वी अचानक एअर फोर्समधील अधिकाऱ्यांच्या एनओसीद्वारे (ना हरकत प्रमाणपत्र) महापालिकेच्या शहर विकास विभागाची परवानगी मिळवून काही बिल्डरांनी उत्तूंग इमारती उभारल्या. सध्या या इमारतींमध्ये रहिवाशीही वास्तव्याला आले आहेत. या पार्श्वभूमीवर नव्याने काढलेल्या आदेशामुळे अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.
संरक्षण मंत्रालयाकडून हवाई दलाच्या तळांविषयीची नियमावली निश्चित केली जाते. कोलशेत येथील बिल्डरांच्या अनेक इमारतींना एअर फोर्सने दिलेली एनओसी अधिकृत आहे का, शहर विकास विभागाने संबंधित एनओसीची एअर फोर्सच्या अधिकाऱ्यांकडे पडताळणी केली होती का, संबंधित एनओसी मिळविणारे बिल्डर व सर्टिफिकेट देणारे अधिकारी आदींबाबत चौकशी करण्याची गरज आहे. एकिकडे उत्तूंग इमारतींना एनओसी देणारे एअर फोर्स अधिकारी कोलशेत येथील भूमिपूत्रांच्या एकमजली घरांच्या दुरुस्तीलाही मज्जाव करीत आहेत, ही बाब आश्चर्यकारक आहे, याकडे नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.
एअर फोर्सच्या अधिकाऱ्यांनी १४ मार्च २०१७ रोजी महापालिकेला पत्र पाठविले होते. मात्र, आता कोरोनाचे आव्हान असताना तब्बल साडेतीन वर्षानंतर काढलेला आदेश संभ्रमात टाकणारा आहे. एअर फोर्सच्या तळाजवळ बड्या बिल्डरांच्या संकूलाला परवानगी देण्यासाठी महापालिका प्रशासनावर कोणी बडी व्यक्ती दबाव आणत आहे का, या दबावामुळे नव्याने आदेश काढून महापालिका अधिकारी पळवाट काढत आहेत का, नव्या आदेशापूर्वी झालेल्या इमारतींबाबत प्रशासनाची भूमिका कोणती आहे, तळाजवळच्या इमारतींना मंजूरी देणारे शहर विकास विभागातील तत्कालीन अधिकारी व तत्कालीन महापालिका आयुक्तांची नावे जाहीर करणार का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नव्या बांधकामांना बंदी घालण्याच्या आदेशाबाबत सविस्तर माहिती द्यावी. तसेच भूमिपूत्रांच्या घरांबाबत एअर फोर्सच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने निश्चित धोरण तयार करावे. आतापर्यंत एअर फोर्सने दिलेली एनओसी आणि त्या एनओसीच्या आधारावर विकास प्रस्तावाला मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.
———————————-

कोलशेत ग्रामस्थांच्या हालाकडे
राजनाथ सिंह यांचे वेधले लक्ष
एअर फोर्सच्या निर्बंधांमुळे कोलशेत येथील ग्रामस्थांच्या होणाऱ्या हालाकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. देशासाठी जमीन देणाऱ्या भूमिपूत्रांना नवे घर व घरदुरुस्ती करण्यासाठी परवानगी द्यावी. तसेच हवाई तळाच्या १०० मीटर परिसरात बहूमजली इमारतींना एनओसी (नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट) सर्टिफिकेट देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी नारायण पवार यांनी संरक्षण मंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!