मुंबई: गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या सणासुदीच्या पार्श्वभुमीवर खाद्यतेल, दुध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई विक्रेते, इत्यादी एफ.डी.ए. च्या रडारवर असून सदर अन्न पदार्थांमध्ये तपासणी दरम्यान भेसळ आढळून आल्यास भेसळखोरांविरुध्द कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी दिलेले आहेत. आतापर्यंत सुमारे दहा कोटी पेक्षा अधिक किमतीचे अन्न पदार्थ व प्रतिबंधित अन्न पदार्थ जप्त केले असून नाशवंत अन्न पदार्थांचा साठा घटनास्थळी नष्ट करण्यात आलेला आहे.

राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्री पदाचा कार्यभार घेताच कोकण, बृहन्मुंबई, नागपूर, अमरावती इ. विभाग स्तरावर आढावा बैठक घेऊन अधिकारी व कर्मचारी यांचेशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले व उपलब्ध मनुष्यबळामध्ये कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अन्न व औषध पदार्थांची मोठ्या प्रमाणात जप्ती मोहिम संपुर्ण महाराष्ट्रभर सुरु आहे. मागील महिन्यात जप्तीच्या एकूण ८३ कारवायांमध्ये १५३ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेतले असून सुमारे २,४२,३५२ कि. लो. इतका अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. ज्याची किंमत रुपये ४,४९,९४,७४७/- इतकी आहे. त्याचबरोबर प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या ४६ कारवाया करण्यात आलेल्या असून एकूण ३,०६,७२, १३९ रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू व तत्सम प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला असून सदर प्रकरणी भा.द.वि. कलम ३२८ सह विविध कलमांतर्गत ३९ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

या कारवायांसोबतच ईट राईट इंडिया उपक्रमाअंतर्गत, ईट राईट मिलेट मेला, मिलेट वॉकॅथॉन, क्लिन स्ट्रीट फुड हब, इट राइट कॅम्पस, अन्न व्यावसायिकांना फॉस्टँक ट्रेनिंग, ईट राईट स्कुल, इ. जनजागृतीचे कार्यक्रम व्यापक स्तरावर घेण्यात येत असल्यामुळे जनमानसात विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सुचना मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी दिल्या. त्याचबरोबर कारवाईची व्याप्ती येणाऱ्या दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर वाढविण्यात येईल असे सुतोवाच केले आहेत. तसेच नागरिकांच्या काही तक्रारी असतील किंवा अन्न पदार्थामधील भेसळीच्या अनुषंगाने काही गुप्त माहिती द्यावयाची असल्यास त्यांनी मुख्यालयातील नियंत्रण कक्षातील टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *