सहा पुष्पांच्या अमृतोत्सवातून होणाऱ्या निधी संकलनातून काश्मीर खोऱ्यातील दोन शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा उभारणीसाठी मदत ……..
डोंबिवली/संदीप वैद्य
डोंबिवली ; टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित अमृतोत्सव या सहा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या श्रुंखलेतील द्वितीय पुष्प दि ८ डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध बासरी वादक अमर ओक आणि सुप्रसिद्ध व्हॅायलिन वादक श्रुती भावे यांच्या फ्लूट ॲंड फिडल (Flute & Fiddle) या अनोख्या आणि नविन संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाने गुंफले गेले.
मराठी आणि हिंदी चित्रपट संगितातील अनेक अजरामर गाणी आणि धून यांची गुंफण करत अमर ओक आणि श्रुती भावे यांनी आपल्या सादरीकरणातून रसिकांची मनं जिंकली.
युही चला चला रे या स्वदेस या सुप्रसिद्ध चित्रपटातील सुप्रसिद्ध गाण्याने सुरूवात झालेल्या या मैफिलीमध्ये सावरे ऐजय्यो, याद पिया की, चपा चपा चरखा या जुन्या हिंदीगाण्यांपासून जिंदगी ना मिलेगी दूबारा मधल्या सेनोरिटा पर्यंत विविध गाणी बासरी आणि व्हॅायलिनवर सादर करण्यात आली. तसेच अमर ओक यांनी रचलेली शास्त्रीय संगितातील १४ रांगांची रागमाला सादर करण्यात आली. सौ भाग्यदा लक्ष्मी, मेरे ढोलना या सारख्या शास्त्रिय संगितावर आधारित रचना देखील कलाकारांनी सादर केल्या. कोणताही गायक नसताना केवळ दोन वाद्यांच्या सादरीकरणातून अमर ओक आणि श्रुती भावेंनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
हाल कैसा है जनाब का, सुनो कहो, आती क्या खंडाला यासारख्या संवाद असणाऱ्या गाण्यांचे सादरीकरण करताना श्रुती भावे आणि अमर ओक यांनी आपल्या अबोल वाद्यांना देखील बोलकं केलं. रसिकांना जणू दोन गायक गात असल्याचा अनुभव आला.
रसिकांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या विविध धून ज्यामध्ये गेम ऑफ थ्रोन्स, साथिया, जेम्स बॉण्ड, एअरटेल, धूम, बेलाशियो, जेलर, डॉन, हाये रामा यासारख्या सुप्रसिद्ध धून मेडलीच्याद्वारे सादर करण्यात आल्या. तर या रावजी चंद्रा यासारख्या लावण्या देखील ओक आणि श्रुती भावे यांनी सादर करून रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सांगता सुनो गौर से दुनियावालो आणि भारत हमको जान से प्यारा है या दोन देशभक्तीपर गाण्यांनी करण्यात आली.
सुप्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी आपल्या खुमासदार शैलीतून संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन केलं आणि कार्यक्रमाच्या शेवटी सीमेवर लढणाऱ्या जवानांबद्दलच्या भावना मांडताना रसिकांचे डोळे देखील पाणावले.
मंडळ अमृतोत्सवाच्या या सहा कार्यक्रमाच्या शृंखलेतून होणाऱ्या निधी संकलनातून हम फाउंडेशनच्या माध्यमातून भारतीय शिक्षा समितीच्या जम्मू व कश्मीर येथील शाळांना प्रयोगशाळे करिता देणगी देण्याचा प्रयत्न करीत आहे.
या शृंखलेतील पहिल्या पुष्पात मंडळाने देणगीतील पहिला टप्पा तर दुसऱ्या पुष्पापर्यंत काही देणगीदारांनी मंडळामार्फत केलेल्या थेट देणगीतून दुसरा टप्पा देखील हम फाउंडेशन ला देऊ केला आहे. मंडळ येणाऱ्या चार कार्यक्रमांमधून देखील आणखी निधी संकलन करून हम फाउंडेशन मार्फत अधिकाधिक निधी भारतीय शिक्षा समिती पर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंडळाचे कार्यवाह बल्लाळ केतकर यांनी सांगितले. सर्व कलाकारांचा मंडळाचे अध्यक्ष सुशील भावे यांनी भेटवस्तू देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. ए. हिमांशू जोशी यांनी केले.