डोंबिवली : कल्याण डोंबिवलीत मागील आठवड्यापासून दमदार पावसाने हजेरी लावली असून नदी नाल्यांच्या पाणीपात्रात वाढ झाली आहे. आज गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील नेतिवली टेकडी येथील एकतानगर भागात पावसाची रिपरिप सुरू असल्याने टेकडीवरील तीन घरांचा काही भाग खालच्या दोन घरांवर कोसळल्याने परिसरात घबराट पसरली. यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसली तरी पाच घरांचे मोठे नुकसान होऊन त्यातील एका महिलेच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती प्रभाग क्षेत्र अधिकारी सविता हिले यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेकडील नेतिवली टेकडीवरील दरड कोसळण्याच्या घटना पावसाळ्यात दरवर्षी घडतात. यामुळेच पावसाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील नेतिवली टेकडी, कचोरे टेकडी तसेच वालधुनी परिसरात राहणाऱ्या शेकडो नागरिकांना केडीएमसी प्रशासनाकडून जून महिन्यातच स्थलांतरणाच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. मात्र आपल्याला पर्यायी व्यवस्था नसल्याचे सांगत ही कुटुंब आजही मृत्युच्या छायेत जगत आहेत.
सोमवारी तीन दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास कचोरे टेकडीवरील दरड कोसळली. डोंगरावरील मातीचा भराव आणि भला मोठा दगड वेगाने घरंगळत खाली आला. मात्र अर्ध्यावर आल्यानंतर सुदैवाने हा दगड एका घरासमोर येऊन थांबल्याने या दुर्घटनेत जीवितहानी किंवा वित्त हानी झाली नाही. मात्र या घटनेनंतर परिसरातील रहिवासी जीव मुठीत धरून राहत असल्याचे स्पष्ट आले. दरम्यान आज दुपारी पाचच्या सुमारास नितीन एकता नगर परिसरातील तीन घरांनी वाढीव बांधकाम केलेल्या घरांचा काही भाग रिपीट पावसामुळे जमीन भुसभुशीत झाल्याने खालच्या दोन घरांवर कोसळला यामुळे मोठा आवाज झाल्याने त्या परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धूम ठोकली. सुदैवाने पाच पैकी चार घरांमध्ये रहिवाशी बाहेर असल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही परंतु भोसले नामक महिला या एका घरात राहत असल्याने या दुर्घटनेत त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली .
याबाबतची माहिती मिळताच पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे. सध्या साई कुटुंब त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या घरी राहण्यास गेले असल्याचे प्रभाग क्षेत्र अधिकारी यांनी सांगितले तर उद्या एकता नगर परिसरात कोणत्या ठिकाणी वाढीव बांधकाम आणि कुठे घर कोसळण्याची भीती आहे अशा घरांचा पंचनामा करून त्यांना पावसाळ्यात घरे स्थलांतरित करण्याचे नोटिसा महापालिकेमध्ये बजावले जाणार असल्याचे हिले यांनी सांगितले आहे.