अविनाश उबाळे
वासिंद : राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या ठाणे अप्पर आयुक्त कार्यालय अंतर्गत असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर अंतर्गत येणाऱ्या ठाणे शहरातील लोढा कॉम्प्लेक्स भाईंदरपाडा येथे नव्याने होणाऱ्या आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाचे भूमिपूजन रविवारी घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणाली द्वारे करण्यात आले.तर ज्या ठिकाणी ही वसतीगृह इमारत होणार आहे.त्या ठिकाणी प्रत्यक्षात राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या शुभहस्ते भुमिपूजन सोहळा संपन्न झाला. यापुर्वी ठाणे जिल्हयातील उल्हासनगर, शहापूर, खर्डी, या ठिकाणीच मुलींची वसतीगृह होती परंतु आता प्रथमच मुंबई लगत असलेल्या ठाणे शहरात आदिवासी मुलींचे अद्यावत असे वसतिगृह उभे राहणार आहे. या वसतीगृहाचा फायदा मुंबई, ठाणे येथे उच्च शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुलींना होणार आहे.
नव्याने होणाऱ्या वसतीगृहात ३२० मुलींच्या निवासाची व्यवस्था होणार असून ही अद्यावत इमारत चार मजली असणार आहे. या वसतीगृह इमारत भुमिपूजन प्रसंगी आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित तसेच ठाण्यातील स्थानिक आमदार प्रताप सरनाईक आदींसह सदर भूमी पूजन प्रसंगी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे , ठाणे विभागाचे अप्पर आयुक्त दीपक कुमार मीना , उपआयुक्त प्रदीप पोळ,सहाय्यक आयुक्त प्रदीप देसाई , शहापूर आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी रंजना किल्लेदार सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी तेजस्वीनी गंलाडे,व आदिवासी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप दळवी यांसह मोठ्या संख्येने आदिवासी विकास शहापूर प्रकल्प विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.