जी प्लस रूग्णालयात हृदयातील तीन ब्लॉकवर एकाचवेळी यशस्वी उपचार

कल्याण दि.1 जानेवारी : कल्याण डोंबिवलीतील वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत आनंद आणि अभिमान वाटेल अशी एक बातमी आहे. कल्याणातील जी प्लस रुग्णालयात हृदय विकाराच्या उपचारांमध्ये अतिशय अवघड समजली जाणारी ट्रायफिकेशनची (हृदयातील तीन ब्लॉकमध्ये एकाच वेळी स्टेन टाकणे) अँजिओप्लास्टी यशस्वीपणे पार पडली आहे. विशेष म्हणजे ठाणेपलीकडील रुग्णालयात पहिल्यांदाच ही अँजिओप्लास्टी यशस्वीपणे करण्यात आल्याने कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा परिसरातील जी प्लस सुपर स्पेशालिटी हार्ट केअर रुग्णालयात, काही दिवसांपूर्वी छातीत दुखू लागल्याने 79 वर्षांची व्यक्ती उपचारासाठी आली होती. त्यावेळी झालेल्या वैद्यकीय तपासणीत त्याच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तब्बल तीन महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांमध्ये सुमारे 80 ते 90 टक्के ब्लॉकेज आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने बायपास सर्जरी करण्याचा सल्ला या रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून देण्यात आला. मात्र रुग्णाचे वय विचारात घेऊन त्याच्या नातेवाईकांनी त्याला नकार दिल्याची माहिती जी प्लस रुग्णालयाकडून देण्यात आली. परंतू रुग्णाच्या जीवाला असणारा धोका पाहता ट्रायफिकेशन अँजिओप्लास्टीचा पर्याय मुख्य कार्डीओलॉजिस्ट डॉ. अमोल जी.चव्हाण यांनी त्यांच्या नातेवाईकांना सांगितला. ज्याला या रुग्णाच्या नातेवाईकांनी मंजुरी दिली.

तर ही ट्रायफिकेशन अँजिओप्लास्टी करताना हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या इतर नसा बंद पडण्याचा धोका होता. मात्र कार्डीओलॉजिस्ट डॉ. अमोल जी. चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय शर्थीचे प्रयत्न करत एकाच वेळी 3 स्टेनस् टाकून हृदयाचा रक्तपुरवठा पुन्हा सुरळीत करत या रुग्णाचे प्राण वाचवले. आणि अत्यंत किचकट असणारी ही अँजिओप्लास्टी यशस्वीपणे पूर्ण केली. डॉ. अमोल जी. चव्हाण यांना ही अवघड अँजिओप्लास्टी पूर्ण करण्यासाठी तब्बल अडीच तास लागले. तर यासाठी डॉ. चव्हाण यांना डॉ. ऋषिकेश गोसावी, डॉ. सागर शाम धीवार, संचालक विजय डी. राठोड, व्यवस्थापक डॉ. अजय सोनवणे, नागेश पगारे आणि अशोक भांगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

आतापर्यंत मुंबईतील मोजक्याच रुग्णालयांमध्ये आणि हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्याच डॉक्टरांकडून ही अवघड अँजिओप्लास्टी यशस्वीपणे करण्यात आली आहे. या लोकांच्या पंक्तीमध्ये आता कल्याणातील जी प्लस रुग्णालय आणि डॉ. अमोल जी. चव्हाण यांनीही मानाचे स्थान मिळवले आहे. त्याबद्दल कल्याण डोंबिवलीतील वैद्यकीय क्षेत्रातून आनंद आणि अभिमान व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!