असल्फा येथे गोदामला आग, मोठी दुर्घटना टळली
घाटकोपर : साकिनाका खैरानी रोड येथील भानू फरसाणला लागलेल्या आगीत 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, पालिका एल विभागाच्या हद्दीत मध्यरात्री असल्फा व्हिलेजमध्ये मोठी आग लागली. मात्र वेळीच आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली.
असल्फा येथील सानेगुरुजीनगरमधील साबणाच्या गोदामाला मध्यरात्री अचानक आग लागली. गोदमाचा वरच्या मजल्यावर एक कुटुंब झोपले होते. मात्र खालच्या मजल्यावरून केमिकल जळल्याचा धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच ते खाली आले. आग लागल्याचे पाहताच त्यांनी आरडाओरड केली. त्याचवेळी समोरच्या रस्त्यावरून नगरसेवक किरण लांडगे आणि त्यांचे कार्यकर्ते जात असतानाच त्यांच्या नजरेस आग पडली. त्याच्यासह कार्यकर्त्यांनी गोदामकडे धाव घेतली. दुकानाचे शटर तोडून आगीवर नियंत्रण मिळवले.तसेच अग्निशमन दलाला पाचारण केले.अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनस्थळी दाखल झाल्या.अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व गोदामातील केमिकल , साबण बाहेर काढून पूर्णतः आग विझवली आणि मोठी दुर्घटना टळली.परंतु या आगीच्या धुराचा केमिकल युक्त वास परिसरात पसरल्याने स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले .