पणजी, 29 नोव्हेंबर : प्रतिष्ठित 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते, अभिनेते आणि लेखक ऋषभ शेट्टी यांना ‘कांतारा’ चित्रपटासाठीच्या अजोड कामगिरीसाठी विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महोत्सवाच्या समारोप समारंभाच्या रोमांचक वातावरणात कांताराच्या प्रीक्वेल-कांतारा, चॅप्टर-1 च्या फर्स्ट लूक ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. रसिकांनी त्याचे मनापासून स्वागत केले. “अशा प्रतिष्ठित व्यासपीठावर मिळालेले प्रेम आणि आदर पाहून मी कृतज्ञ आहे” अशा भावना व्यक्त करत शेट्टी यांनी आभार मानले.
चित्रपटनिर्मिती मागचे तत्वज्ञान सांगताना शेट्टी म्हणाले, “आपल्या चित्रपटांना स्वतः अभिव्यक्त होऊ देण्यावर माझा विश्वास आहे. जितके कमी बोलले जाईल तितके जास्त यश मिळेल”. ‘कांतारा’ कडे रसिकांचा ज्या प्रकारे ओढा राहीला त्यातून चित्रपटाप्रती त्यांची विनम्रता आणि समर्पण दिसून येते.
भारतीय सिनेमाच्या जागतिक विस्ताराचा संदर्भ देताना शेट्टी म्हणाले की, “भारतीय सिनेमा खरोखरच वैश्विक झाला आहे. भारतात तयार केल्या जाणाऱ्या असाधारण आशयगर्भ कामाचा हा थेट परिणाम आहे”.
कन्नड सिनेमाच्या सार्वत्रिक पसंतीचा संदर्भ देत, भाषिक अडथळे पार करण्याची त्याची क्षमता शेट्टी यांनी अधोरेखित केली. या सर्वसमावेशकतेचा पुरावा म्हणून त्यांनी ‘कांतारा’ ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाचा उल्लेख केला.
“माझे चित्रपट हे आपल्याला व्यक्ती म्हणून बांधणाऱ्या कथा आणि भावनांचा विस्तार आहेत” असे शेट्टी म्हणाले.
शेट्टींच्या दिग्दर्शन कौशल्यावर मोहर उमटवत, स्वदेशी संस्कृतीत रुजलेल्या, सांस्कृतिक आणि सामाजिक सीमांच्या पलीकडे जाऊन आणि सर्वत्र प्रतिध्वनित होणाऱ्या कथा सांगण्याच्या त्यांच्या क्षमतेवर ज्यूरींनी शिक्कामोर्तब केले आहे. परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील संघर्षामध्ये परिणामकारक संदेश देत, कांतारा एका काल्पनिक खेड्यातील मानवता आणि निसर्ग यांच्यातील वैचारिक संघर्षाचा शोध घेते.
रौप्य मयूर पदक, 15 लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे स्वरूप असलेल्या पुरस्काराने शेट्टी यांना गौरवण्यात आले.