मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत केलेल्या भाषणावरून पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार आहे. राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
औरंगाबाद येथील सभेपूर्वी राज ठाकरे यांना पोलिसांनी काही अटी घातल्या होत्या. या अटींच्या आधारे पोलिसांनी सभेला परवानगी दिली होती. मात्र या सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगणे यांच्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. सिटी चौक पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार राज ठाकरे हे प्रथम क्रमाकांचे आरोपी आहेत. राज ठाकरेंसह सभेला परवानगी मागणारे राजीव जवळीकर आणि इतर आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
महाराष्ट्राबाहेरील गुंडांची मदत : राऊतांचा आरोप
मशिदीवरील भोंग्यांच्या निमित्ताने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू असताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी महाराष्ट्राबाहेरील गुंडांची मदत घेण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले. तर, दुसरीकडे राज्यातील गृह विभागाकडेदेखील अशाच प्रकारची माहिती असल्याने पोलीस सतर्क असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
माध्यमांशी बोलताना राऊत यांनी सांगितले की, राज्याच्या बाहेरुन काही गुंड प्रवृत्तीचे लोक मुंबईत आणून गडबड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांची राज्यात ताकद नाही. अशा लोकांकडून हे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या सुपाऱ्या चालणार नाही. मुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष असल्याचेही राऊत यांनी म्हटले.