मुंबई ; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी होर्डिंग मालकासह मुंबई महानगरपालिका, रेल्वे पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस गृह निर्माण संस्थेतील संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंबईतील घाटकोपर येथील छेडानगर परिसरात लोखंडी जाहिरात फलक वादळी वाऱ्यामुळे कोसळून पेट्रोल पंपावर पडल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत वाहने आणि शंभरहून अधिक नागरिक अडकले गेले. त्यापैकी १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू तर किमान ७८ जखमी झाले. या घटनेनंतर महानगर पालिकेच्या होर्डिंग धोरणांची पोलखोल झाली आहे. मुंबईत सुमारे ४० X ४० आकाराचे होर्डिंग लावण्यास परवानगी असताना, १२० X १२० चौरस फूट आकाराचे होर्डिंगला परवानगी दिल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे नियमबाह्य पध्दतीने परवानगी दिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच ही जागा रेल्वे पोलिसांच्या हद्दीत येते. रेल्वे पोलीसांनी देखील बेकायदेशीर होर्डिंगला मान्यता दिली आहे. त्यामुळे परवानगी दिलेल्या संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशीचे आदेश द्या. महाराष्ट्र पोलीस गृह निर्माण संस्थेच्या देखील जागेचा काही भाग होता. या सर्व यंत्रणांनी डोळेझाक करत, होर्डिंग लावण्यास मान्यता दिली. या सर्व अधिकाऱ्यांवर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. नियमबाह्य पद्धतीने होर्डिंग लावल्याप्रकरणी त्या मालकाला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी दानवे यांनी केली.
दुर्घटनेतील जखमी आणि मृत पावलेल्या व्यक्तींना संबंधित होर्डिंग मालकाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी राज्यातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. धोकादायक होर्डिंग काढण्याबाबत योग्य सूचना द्याव्यात. तसेच जखमी झालेल्या व्यक्ती, मृत व्यक्तींच्या वाहने आणि इतर स्थावर मालमत्तेच्या नुकसानीची शासनाने तातडीने भरपाई करून द्यावी, असे दानवे यांनी पत्रात म्हटले आहे.*****