मुंबई : तृतीयपंथींविषयी अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकुर यांनी केली आहे. तृतीयपंथीयांच्या आंदोलनाला वंचितने पाठिंबा दिला आहे.
नितेश राणे यांनी बोलताना तृतीयपंथांचा उल्लेख केला होता. हा आमचा अपमान आहे. त्यामुळे नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी तृतीयपंथांनी करीत पुण्यात आंदोलन केले. पोलिसांनी बाजूला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तृतीयपंथी रस्त्यावर झोपले. पोलीस आणि तृतीयपंथी यांच्यात झटापटही झाली. वंचितचे नेते सुजात आंबेडकर हे आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. ज्यांनी अपमान केला आहे त्या संदर्भात गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी सुजात आंबेडकर यांनी केली आहे. जर आज पोलिसांनी कारवाई केली नाही. तर आम्ही संध्याकाळपर्यंत भूमिका जाहीर करू, असा इशारा सुजात आंबेडकर यांनी दिला आहे.
भाजपा आमदार नितेश राणे हे सातत्याने समाजात धर्म, जात व लिंग आधारित वक्तव्य करीत असून समूह-समूह, जाती-जातीत द्वेष व तेढ निर्माण करीत असतात. नितेश राणे यांचे तृतीयपंथीया बद्दलचे अपमानजनक वक्तव्य विकृतीचा भाग नसून प्रवृत्ती झाली आहे. अशी प्रवृत्ती समाजात लिंग, धर्म व जातीच्या नावाने द्वेष व तेढ निर्माण करते. सर्वोच्च न्यायालयाने अशी प्रवृत्ती रोखण्यासाठी पोलिसांना तत्काळ गुन्हे नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत याकडे रेखा ठाकूर यांनी पोलिसांचे लक्ष वेधलं आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांच्या बेताल व अपमान जनक वक्तव्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याच्या ऐवजी वंचित बहुजन महिला व युवा आघाडीच्या सदस्या शमीभा पाटील या बंड गार्डन पोलिस स्टेशन पुणे, येथे गेले असता पोलिसांकडून त्यांनाच दमदाटी व अपमान जनक वागणूक मिळाली. त्यांची तक्रार नोंदवून न घेता त्यांनाच पोलिसांनी फरफटत नेले. हे अत्यंत बेजबाबदार व निंदनीय कृत्य पोलिसांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र या घटनेचा तीव्र निषेध करत असून पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही तर वंचित बहुजन आघाडी न्यायालयीन मार्गाने आंदोलन करेल असा इशारा रेखा ठाकूर यांनी दिला.
दरम्यान नितेश राणे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तृतीयपंथी समाजाने माझं वाक्य व्यवस्थित ऐकलं नसेल. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं वक्तव्य आहे. त्याचा आधार घेऊन मी बोललो आहे, असं नितेश राणे म्हणाले.