ठाणे : पुष्पक एक्सप्रेसमध्ये एका विवाहित सामुहिक महिलेवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच पून्हा गोरखपूर एक्सप्रेसमध्ये गुटखा विक्रीच्या वादातून फेरीवाल्यांमध्ये हाणामारी होऊन एकावर ब्लेडने वार केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडलीय. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पून्हा एकदा ऐरणीवर आलाय. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी मिळत नसताना चोरटे, गर्दुल्ले ,फेरीवाले , दरोडेखोर रेल्वेत कसे प्रवेश करू शकतात ? असा प्रश्न उपस्थित होत असून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय.
पनवेल- गोरखपूर एक्सप्रेस कल्याण स्टेशनहून टिटवाळयाच्या दिशेने जात असताना गुटखा विक्रीच्या वादातून तीन फेरीवाल्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. अंकुश सरोज आणि मोहम्मद बिलाल शेख या दोघांनी पवनकुमार गुप्ता नामक फेरीवाल्यावरधारदार ब्लेडने वार केले. यात हल्ल्यात पवन गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. ट्रेनमधील टीसीने याची महिती रेल्वे कंट्रोलला दिली. कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शारदूल हे आपल्या पथका सोबत कसाऱ्याला पोहचले. जखमी आणि आरोपींना कसारा स्थानकात रेल्वे पोलिसांनी पकडून ठेवले होते. जखमीला नाशिक सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दोन्ही आरोपीना कल्याण जीआरपीने अटक केली आहे. सध्या ट्रेनमध्ये लस घेतल्याशिवाय प्रवास करु शकत नाही. अशा परिस्थितीत सर्रासपणे गुटखा विक्रेत्यांना कसा काय प्रवेश मिळतो. फेरीवाले धारदार शस्त्रे घेऊन फिरतात. एकमेकांवर जीवघेणा हल्ला करतात. आरपीएफच्या आशीर्वादाशिवाय फेरीवाले जाऊ शकत नाही. या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे. अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.