कल्याण ;- महावितरणकडून कल्याण परिमंडलात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांच्या ठिकाणी वीजसुरक्षेसाठी फायबर रीइन्फोर्स प्लॅस्टिकपासून तयार केलेले नव्या तंत्राचे मजबूत व टिकाऊ संरक्षक जाळ्यांचे कुंपण प्रायोगिक तत्त्वावर लावण्यात येत आहे. पारंपरिक लोखंडी जाळीदार कुंपणाच्या तुलनेत या फायबर प्लॅस्टिकचे कुंपण अधिक फायदेशीर आहे. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या संकल्पनेतून कल्याण परिमंडलात हा पथदर्शी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
सार्वजनिक गर्दीच्या, रस्त्याच्या बाजूला, दाट वस्तीच्या, बाजारपेठांमध्ये आदी ठिकाणी वितरण रोहित्र आहेत. या सार्वजनिक ठिकाणी वीजसुरक्षेच्या दृष्टीने परंपरागत लोखंडी जाळ्यांचे संरक्षक कुंपण लावण्यात आले आहे. तथापि पावसामुळे लोखंडी कुंपण गंजणे, सडणे, तुटणे, वाकणे, मोडतोड करून चोरीद्वारे भंगारात विकणे आदी प्रकार होत आहेत. त्यामुळे लोखंडी कुंपणाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी महावितरणला सातत्याने उपाययोजना करावी लागते.
वीजसुरक्षेसाठी आवश्यक संरक्षक कुंपणावर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून आता लोखंडाऐवजी फायबर रीइन्फोर्स प्लॅस्टिकचा पर्याय आला आहे. फायबर प्लॅस्टिकच्या सुमारे सात-आठ फुट उंचीच्या जाळीदार संरक्षक कुंपणावर ऊन-पावसाचा कोणताही परिणाम होत नाही. हे प्लॅस्टिक सडत नाही तसेच आगीने जळतही नाही. मजबूत व टिकाऊ असल्याने तुटणे, खराब होणे सहज शक्य नाही. भंगारात या प्लॅस्टिकला काहीच किंमत नसल्याने चोरी होण्याचे प्रकार होणार नाहीत. कल्याण मंडल एक अंतर्गत डोंबिवली, कल्याण पूर्व आणि पश्चिमेत सर्वाधिक १३०, कल्याण मंडल दोन अंतर्गत उल्हासनगर व कल्याण ग्रामीणमध्ये ५०, वसई, विरार, नालासोपाऱ्याचा समावेश असलेल्या वसई तसेच पालघर मंडल कार्यालयांतर्गत प्रत्येकी २५ असे कल्याण परिमंडलात एकूण २३० ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर फायबर रीइन्फोर्स प्लॅस्टिकचे संरक्षक कुंपण लावण्यात येत आहेत.