मुंबई : खासदार नवनीत राणा यांचे बनावट जात प्रमाणपत्र असल्याने त्यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी जाहीर करू नये.जो पक्ष त्यांना उमेदवारी जाहीर करेल त्या पक्षाच्या विरोधात चर्मकार समाज मतांचा बहिष्कार टाकेल असा इशारा चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
खा. नवनीत रवी राणा यांनी राजीनामा द्यावा, या मागणीचे निवेदन त्यांच्या अमरावतीस्थित कार्यालयात जाऊन दिल्याचे संजय खामकर यांनी यावेळी सांगितले. नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघातून अनुसूचित जातीच्या जागेवर २०१९ मध्ये खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या बनावट जातीच्या प्रमाणपत्राविरोधात मुंबई उच्च न्यायालयात २०२१ मध्ये राणा यांच्या विरोधात निकाल लागला आहे. खासदार नवनीत राणा यांचे बनावट जातीचे प्रमाणपत्र असल्याचे सिद्ध झाले असून मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द केले केलेले आहे.असे संजय खामकर यांनी यावेळी सांगितले.
खासदार नवनीत राणा अनुसूचित जातीच्या खासदार म्हणून प्रतिनिधित्व करीत असताना त्यांच्यात संत रोहिदास महाराज व डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या विचारांचा अभाव दिसून येत आहे. त्यांनी अनुसूचित जातीकरिता विकासाची भूमिका घेतली नाही. संसदेत अनुसूचित जातीच्या गंभीर प्रश्रावर आवाज उठविला नाही. असे खामकर यावेळी म्हणाले.
अनुसूचित जातीच्या महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना सतत घडत असताना महिला खासदार असूनसुद्धा त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कधीही पुढे आल्या नसल्याचा आरोप खामकर यांनी केला आहे. नवनीत राणा यांनी बनावट जात प्रमाणपत्र रद्द केलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा स्वीकार त्यांनी करावा.अशी मागणी संजय खामकर यांनी केली आहे.
खासदार नवनीत राणा यांनी राजीनामा न दिल्यास राज्यातील सर्व अनुसूचित जातीच्या संघटनांना एकत्र आणून खासदारकीच्या राजीनाम्याकरिता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही खामकर यांनी यावेळी दिला.