डोंबिवली : दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवाकरिता १ ते १८ सप्टेंबर दरम्यान कोंकण रेल्वेने मध्य व पश्चिम रेल्वेमार्फत गणपती स्पेशल उत्सव विशेष गाड्या सोडल्या आहेत. तथापी या सर्व गाड्या फुल्ल झाल्या असल्याने गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकणाकडे अतिरिक्त गाड्या सोडाव्यात याकडे उद्धव ठाकरेंच्या सेनेने रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीनुसार या मार्गावर अतिरिक्त गाड्या सोडणार असल्याचे आश्वासन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिले.


 शिवसेनेचे कल्याण जिल्हा संपर्कप्रमुख तथा उपनेते गुरूनाथ खोत, जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, जिल्हा संघटक वैशाली दरेकर-राणे यांच्यासह उपजिल्हाप्रमुख विजय देसाई, विभागप्रमुख वैभव शिरोडकर या शिष्टमंडळाने कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनचे मुख्य परिचालन प्रबंधक व्ही. सी. सिन्हा यांची भेट घेतली. यावेळी प्रबंधक सिन्हा यांनी उद्धव सेनेच्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला.


    गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या आत्ताच फुल्ल झाल्या आहेत. प्रत्येक गाडीला शेकडोंची प्रतीक्षा यादी आहे. रेल्वेचे नेहमीचे रडगाणे असते. कोंकण रेल्वे मार्गावर उत्सव कालावधीत अजुन जादा गाड्या सोडता येत नाहीत. ट्रॅक व्यस्त असल्याने व क्षमता संपल्याने आणखी अतिरिक्त गाड्या सोडता येत नाहीत.


प्रत्येक दिवशी 6 ते 7 मालगाड्या सोडल्या जातात. उत्सव काळातील 15 दिवसांमध्ये सदर मालगाड्या पूर्णतः बंद करून किंवा पर्यायी दुसऱ्या मार्गाने वळवून त्या जागी किमान अप-डाऊन 100 फेऱ्या सोडल्या जाऊ शकतात. तसेच कोंकण रेल्वे मार्गाने दक्षिण भारतात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या अतीजलद गाड्या उत्सव काळात कोंकण मार्ग वगळून पूर्वीच्या मार्गाने वळविण्यात याव्यात. म्हणजे त्या जागी काही नव्या गाड्या सोडल्या जाऊ शकतील. 

कुडाळ व सावंतवाडी दरम्यान झाराप स्टेशन असून गणेशोत्सव काळात काही गाड्यांना थांबा देण्यात यावा. कारण झाराप स्टेशन सावंतवाडी तालुक्याच्या वेंगुर्ला आणि कुडाळ तालुक्याच्या माणगाव खोऱ्यातील जवळपास 100 गावांना मध्यवर्ती व जवळचे सोयीस्कर ठिकाण आहे. तसेच काही गाड्यांना दिवा जंक्शन येथे थांबा देण्यात यावा, अशीही मागणी उद्धव सेनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!