नवी दिल्ली : आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास संघाच्या (ट्रायफेड) वतीने पारंपरिक आदिवासी कला, कलाकृती, चित्रे, मातीची भांडी, वस्त्र, सेंद्रिय नैसर्गिक उत्पादने आणि बरेच काही ‘ट्राईब्ज इंडिया’ दालनाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात येणार आहे. ९ आणि १० सप्टेंबर २०२३ रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जी -20 नेत्यांच्या शिखर परिषदेचा एक भाग म्हणून हे प्रदर्शन क्राफ्ट्स बाजार (सभागृह 3) येथे आयोजित केले जात आहे.
पिथोरा कलेचे प्रख्यात कलाकार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित परेश राठवा यावेळी उपस्थित राहून गुजरात आणि मध्य प्रदेशातील राठवा, भिलाला, नाईक आणि भील जमातींच्या समृद्ध आणि पारंपरिक कलेचे थेट प्रात्यक्षिक सादर करतील.जुन्या कलांना नवसंजीवनी देण्याच्या या तळमळीच्या दृष्टिकोनाने केवळ आपल्या सांस्कृतिक समृद्धीचे पुनरुज्जीवन केले नाही तर जगभरात कुतूहल निर्माण केले आहे.
मध्य प्रदेशातील गोंड आणि ओदीशातील कारागिरांनी काढलेली सौरा चित्रे डोळ्यांचे पारणे फेडणारी आहेत . लेह-लडाख आणि हिमाचल प्रदेश या उंचावरील भागातील अंगोरा आणि पश्मिना व्यतिरिक्त, बोध आणि भुतिया जमातींनी विणलेल्या शाली इथे बघायला मिळणार असून हे चुकवू नये असेच आहे. नागालँडच्या कोन्याक आदिवासींचे रंगीबेरंगी दागिने डोळ्यांना आनंद देतात.
धार्मिक कार्ये आणि शुभ कार्यक्रमांमध्ये परिधान केल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशातील महेश्वरी रेशमी साड्यांची श्रीमंती पाहायला मिळते . एरी किंवा “मिलेनियम सिल्क” ला, आसाममधील बोडो जमातीने अतिशय नाजूकपणे बनवले आहे जे समृद्धीला एक नवीन परिमाण देते.
वितळलेले धातू, मणी, रंगीबेरंगी काचेचे तुकडे, लाकडी चेंडू यापासून कोरलेले ढोकरा दागिने यातून पारंपरिकतेसह वेगळेपण आणि समृद्धी दिसून येते. हे पारंपरिक दागिने नैसर्गिक संकल्पनेवर आधारित आणि पारंपरिक आणि अत्याधुनिक आहेत. पश्चिम बंगाल, ओदीशा , छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील आदिवासी कारागीर या मूळ कलाकृतींचे शिल्पकार आहेत.
राजस्थानच्या मीना आदिवासी कारागिरांनी धातूपासून तयार केलेल्या अंबाबरी कलाकुसरीत मोहकता आणि सौंदर्य अतिशय नाजूकपणे कोरले आहे. ही उत्पादने रंग किंवा सजावटीची कला असलेली एनालिंग वापरून तयार केली जातात किंवा पृष्ठभागावर फुले, पक्षी इत्यादींच्या नाजूक रचना जोडून धातूचा पृष्ठभाग सजवला जातो. ज्या घरांमध्ये अशा कलाकुसरीच्या वस्तू ठेवल्या जातात त्या घरांची या वस्तू अनोखी शोभा वाढवतात आणि घरात प्रसन्नता आणतात .
आंध्र प्रदेश, गुजरात, तमिळनाडू, छत्तीसगड आणि महाराष्ट्रासह भारतातील विविध राज्यांतील अराकू व्हॅली कॉफी, मध, काजू, तांदूळ, मसाले यासारखी नैसर्गिक उत्पादने ट्रायफेडद्वारे प्रदर्शित केलेल्या अनेक उत्पादनांपैकी काही आहेत.
या सर्वांसह इतर अनेक उत्पादने ट्राइब्स इंडिया दालनामध्ये प्रदर्शित केली जात आहेत ज्यात विविधतेतील एकता, सांस्कृतिक आणि पारंपरिक कोलाज, राष्ट्राच्या वारशाची समृद्धता या सर्व गोष्टी एकाच छताखाली प्रदर्शित केल्या जात आहेत.