मुंबई : भारतातील प्रत्येक नागरिकाचा, गावाचा, शहराचा आणि राज्याचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचाव्यात, त्यांचा नागरिकांना लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून भारतातील महिला, युवक, शेतकरी, खेळाडू आणि गरजूंच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहोचविण्याचे शासनाचे ध्येय आहे. या यात्रेच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनांच्या फायद्यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करू,अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या निमित्ताने प्रधानमंत्री मोदी यांनी आज देशभरातील विविध ठिकाणी नागरिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. दि. १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे संपूर्ण देशभरात आयोजन करण्यात आले आहे. बृहन्मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये विशेष चार वाहनांद्वारे दि. २८ नोव्हेंबर २०२३ ते दि. २६ जानेवारी २०२४ पर्यंत या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सी’ विभागातील माधव बाग, कावसजी पटेल मार्ग, सी. पी. टँक सर्कल, भुलेश्वर येथे नागरिकांना विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनांची माहिती देण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला.

यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार राम कदम, माजी आमदार अतुल शहा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आदींसह मान्यवर उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक, चंदीगढ, जम्मू काश्मिर, बिहार आणि गुजरात येथील विविध योजनेच्या लाभार्थ्यांशी यावेळी प्रातिनिधीक संवाद साधला.

‘विकसित भारत संकल्प यात्रे’बाबत प्रधानमंत्री मोदी म्हणाले, देशभरातील कानाकोपऱ्यात यात्रा पोहोचत आहे. शेतकऱ्यांना बियाणे, आधुनिक अवजारे, वीज-पाणी, रुग्णांना वेळेवर उपचार-औषधे, बेरोजगारांना व्यवसायासाठी भांडवल, युवकांना रोजगार यात्रेच्या माध्यमातून मिळत आहे. ग्रामीण भागातील दहा कोटी महिला विविध योजनांच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. येत्या काळात याच योजनांच्या माध्यमातून दोन कोटी महिलांना लक्षाधीश बनविण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचेही प्रधानमंत्री मोदी हे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *