गोकाष्ट लाकडांसह पाला-पाचोळा-झावळ्यांचा वापर
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील शिवप्रतिमा सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे सालाबादप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक प्रदूषणमुक्त होळीचा सण साजरा करण्यात आला. गाईच्या शेणाने बनविलेल्या लाकडापासून, अर्थात गोकाष्टासह झाडांचा पाला-पाचोळा आणि नारळाच्या झावळ्यांचा होळी उभारण्यासाठी वापर करण्यात आला होता. त्यामुळे निवासी विभागातील रहिवाशांनी खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त होळी साजरी केली.
एमआयडीसीमध्ये रासायनिक आणि इतर प्रदूषण मोठ्या प्रमाणात असल्याने वृक्षांवर आघात न करता आणि त्यात लाकूड जाळून प्रदूषणाची आणखी भर न घालता जर अशा प्रकारे होळीचा सण साजरा केल्यास एक चांगला संदेश/पर्याय आपण जनतेसमोर देऊ शकतो, असे शिवप्रतिमा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सभासदांना वाटल्याने त्यांनी यंदाही पर्यावरणपूरक प्रदूषणमुक्त होळीचा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला.
कै. अशोक कदम मार्गावरील श्रेयस सोसायटीजवळ होळी उभारण्यासाठी गोकाष्ट लाकडांसह परिसरात साचलेला झाडांचा पाला-पाचोळा, नारळ झाडाच्या झावळ्या, आदी टाकावू व जळावू वस्तू गोळा केल्या. या साऱ्याची होळी बांधून भटजी करवी एक जोडप्याकडून विधिवत पूजा करून होळी पेटविण्यात आली. वाईट शक्तींचा नाश होण्यासह परिसर प्रदूषणमुक्त होऊदे, सर्वांना सुख आणि समृद्धी लाभू दे, असे गाऱ्हाणे घालण्यात आले. या प्रसंगी निवासी परिसरातील जवळपास पाचशेहून अधिक रहिवासी उपस्थित होते. या पर्यावरणीय प्रदूषणमुक्त होळीसाठी सागर पाटील, मंदार स्वर्गे, माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, आदींनी यांनी विशेष मेहनत घेतली.
पर्यावरणावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
होलिकोत्सवाचे औचित्य साधून मिलापनगर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनतर्फे पर्यावरणपूरक सण होळी आणि रंगपंचमी या विषयावर पर्यावरण तज्ज्ञांनी उपस्थितांशी संवाद साधला. पर्यावरण अभ्यासक डॉ. पुरुषोत्तम काळे, वनस्पतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. श्रेया भानप आणि पर्यावरणप्रेमी डॉ. प्रल्हाद देशपांडे यांनी आपले विचार मांडले. यावेळी उपस्थित श्रोत्यांच्या प्रश्नांना तिन्ही तज्ज्ञांनी समर्पक उत्तरे दिली. होळी आणि रंगपंचमी सणाच्या निमित्ताने या भागातील रहिवाशांना तज्ज्ञांकडून उत्तम मार्गदर्शन लाभले.