भारतीय लष्काराने उभारलेले एल्फिन्स्टन, करी रोड आणि आंबिवली पुलाचं लोकापर्ण
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर भारतीय लष्कराने उभारलेल्या आंबिवली करी रोड आणि एल्फिन्स्टन या तिन्ही पुलाचं आज लोकापर्ण करण्यात आलं. एल्फिन्स्टन आणि करी रोड या पुलाचं लोकापर्ण रेल्वे मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांच्या हस्ते झालं.
आंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचं लोकापर्ण करण्याचा मान महिला प्रवासी काजल पगारे व इतर महिला प्रवाशांना मान देण्यात आला.
एल्फिन्स्टन पुलावर सप्टेंबर महिन्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत 23 प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलांचा प्रश्न चव्हाटयावर आला होता. भारतीय लष्काराने पुलाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली हेाती. त्यानंतर त्यानंतर भारतीय सैन्यानं युद्धपातळीवर काम करत या पुलाची उभारणी केलीय. लष्कराच्या बॉम्बे सॅपर्स या पूल उभारणी विभागाने बेली पद्धतीचा पादचारी पूल उभारला आहे.
रेल्वेमंत्री, मुख्यमंत्रयाचा लोकल प्रवास
एल्फिन्स्टन येथे हा कार्यक्रम होता. वेळेची बचत व्हावी यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार अरविंद सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते परळ असा लोकलने प्रवास केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपत्तीच्या काळात लष्कर मदतीसाठी धावते. पण अशा प्रकारच्या कामांसाठीही लष्कराने पुढे येऊन हे काम वेळेत पूर्ण केले. भारतीय लष्कराने विक्रमी वेळेत या तीनही पुलांचे काम पूर्ण केले आहे. त्यांची ही कामगिरी महत्त्वपूर्ण अशीच आहे. पादचारी पुलांची अत्यावश्यकता ध्यानात घेऊन, लष्कराला पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो लष्कराने आपल्या कामगिरीने योग्य ठरविलाय. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सुविधांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून योग्य ते सहकार्य मिळाले. केंद्रीय अर्थसंकल्पात चाळीस हजार कोटींची तरतूद केली आहे. तर यापूर्वीच अकरा हजार कोटी रुपयेही मिळाले आहेत. मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा ही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे. त्यामुळे मुंबईकराचे जीवन गैरसोयमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. त्याची सुरुवात आज या लोकार्पणातून झालीय असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईकरांसाठी शंभरहून अधिक पूल ..रेल्वेमंत्री गोयल
केंद्रीय रेल्वेमंत्री गोयल म्हणाले की, भारतीय लष्कराने ही तीनही पुल विक्रमी वेळेत हे काम पुर्ण केले आहे. त्याचबरोबर रेल्वेच्या यंत्रणेनेही सतरा पुलांचे काम पूर्ण केले आहे. याशिवाय जून २०१८पर्यंत आणखी बावीस पूल पूर्ण होतील. तर आणखी ५६ पुलांच्या कामांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईकरांसाठी शंभरहून अधिक असे पादचारी पूल उपलब्ध होतील. मुंबईसाठी एकावन्न हजार कोटींचा एकात्मिक विकास आराखडा रेल्वेने तयार केल्याचे गोयल यांनी सांगितले.