डोंबिवली : गुरुवारी रात्री डोंबिवली एमआयडीसी परिसरात पावणे आठ वाजता पावसाची सुरवात होताच मिलापनगर तलाव जवळ मोनालिसा सोसायटी समोर झाडाची एक मोठी फांदी तुटून हायटेन्शन वायरवर पडल्याने मोठा स्फोट होऊन वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी येऊन पाहणी केली असता सदर झाडाची फांदी हटवण्यासाठी फायर ब्रिगेड आणि हायड्रा क्रेन यांची आवश्यकता असल्याने त्यांना बोलाविण्यात आले. त्यांनी केलेल्या चार तासांच्या अथक प्रयत्नांनी सदर जाड फांदी हायटेन्शन वायर पासून अलग केली व काही इतर धोकादायक फांद्या तोडल्या. रात्री एक वाजता आसपास वीज पुरवठा चालू करण्यात आला. संपूर्ण एमआयडीसी भागात तब्बल चार तासापेक्षा अधिक वेळ वीज पुरवठा बंद असल्याने नागरिकांचे हाल झाले.
*एमआयडीसी भागात रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे काम चालू आहे. त्यात अचानक पाऊस पडल्याने सर्वत्र चिखलमय परिस्थिती त्यात खड्डे आणि रस्त्यावर स्ट्रीट लाईट बंद असल्याने रात्री काळोखात आपल्या घराकडे परतणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले. त्यामुळे येत्या पावसाळ्यात आपले काय हाल होणार याची आगाऊ प्रचिती येथील रहिवाशांना आली आहे. त्यामुळे इथल्या रस्त्यांचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले नाही तर गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. रस्त्यांची कामे जेसीबी मशीन द्वारे करतांना महावितरणच्या केबल आणि पाण्याच्या पाइपलाइन खराब (damages) झाल्या आहेत. येत्या पावसाळ्यात वीज वाहिन्यात पाणी शिरल्याने नादुरुस्त होण्याची भीतीआहे. सध्याचे रस्त्यांचे हळुवार काम बघता हे काम पावसाळ्यापूर्वी होणे मुश्किल दिसत आहे. महावितरणने आताच खबरदारी म्हणून उच्चदाबंचा वीज वाहिन्यांवरील येणाऱ्या झाडांचा फांद्या यांची छाटणी करण्याचे काम तातडीने सुरू करणे आवश्यक आहे. शिवाय रस्त्यांची कामे तातडीने पावसाळ्यापूर्वी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एमआयडीसीने पाण्याच्या खराब झालेल्या पाइपलाइन तपासून घेणे जरुरी आहे. कारण पावसाळ्यातील दूषित पाणी सदर पाइपलाइन मध्ये मिळाल्याची शक्यता आहे. शिवाय पाइपलाइन मध्ये गळती झाल्यास पावसाळ्यात ती समजून येत नाही. एकंदर येणारा पावसाळा एमआयडीसीकरांसाठी धोक्याचा इशारा देणारा व हाल करणारा आहे अशी भीती स्थानिक रहिवाशी राजु नलावडे यांनी व्यक्त केली.