मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यात अजिबात तथ्य नाही. मी माझ्या पक्षात पूर्ण समाधानी आहे. मला माझ्या खात्यांतर्गत विषयावर निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, मला दिलेलं काम मी नियोजनबद्ध रितीने पार पाडत आहे. त्यात मातोश्री अथवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अजिबात हस्तक्षेप नाही असे स्पष्टीकरण शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
एकनाथ शिंदे पुढे म्हणतात, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम देखील पूर्ण करत आहे. नारायण राणे हे स्वतः मुख्यमंत्री होते त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच तो घ्यावा लागतो हे त्यांना देखील नक्कीच ठाऊक असेल. ते स्वतःही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री असल्याने उद्या धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी त्यांनाही मोदी साहेबांना विचारूनच तो निर्णय घ्यावा लागेल. त्यात गैर असे काहीच नाही, त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यात अजिबात तथ्य नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे .
नारायण राणे काय म्हणाले..
शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळले आहेत. मातोश्रीला विचारल्याशिवाय त्यांना एकाही फाईलवर सही करता येत नाहीत असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी केला होता राणेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ते शिवसेनेत कंटाळले आहेत. मी त्यांना फोन करणार आहे जर ते आमच्याकडे आले तर स्वागतच आहे असा दावा राणे यांनी केला होता .