ठाण्यात नरेश म्हस्केंच्या उमेदवारीला भाजपचा विरोध, नवी मुंबईत ६४ माजी नगरसेवक पदाधिका-यांचे राजीनामा
ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघावर भाजपने दावा केला असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने नवी मुंबईतील ६४ माजी नगरसेवक व पदाधिका-यांनी राजीनामा दिला आहे. तसेच आपल्या मुलाच्या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेसोबत डिल केल्याचा खळबळजनक आरोप भाजप पदाधिका-याने केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना शिंदे गटाच्या वाटयाला कल्याण आणि ठाणे हे दोन मतदार संघ आले आहेत. कल्याणमधून डॉ श्रीकांत शिंदे तर ठाण्यातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाण्याचा जागेवरून भाजप पदाधिकारी चांगलेच संतापले आहेत. नवी मुंबईतील तब्बल ६५ माजी नगरसेवकांनी आणि ५३९ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या पदाधिकाऱ्यांची प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडणाऱ्या पदाधिकाऱ्याने प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत खळबळजनक आरोप केला आहे.
भाजप पदाधिकाऱ्याचा हा खळबळजनक दावा
“आमच्या भाजपच्या वतीने अनेक बैठका होत असताना आम्हाला सांगण्यात आलं की, कोणत्याही परिस्थितीत भाजप पक्षाला ठाणे लोकसभा मतदारसंघ हा सोडण्यात येईल, भाजपच्या वतीने एकमेव उमेदवार इच्छुक होते ते म्हणजे संजीव नाईक. दुसरा कुठलाही उमेदवार इच्छुक नव्हता. आम्ही सर्व खात्रीशीर होतो. पण काल सकाळी बातमी येऊन धडकली. नरेश म्हस्के यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली. ते भले महायुतीचे उमेदवार आहेत. पण ठाणे लोकसभा मतदारसंघात जे ४ विधानसभा मतदारसंघ हे भाजपच्या प्रभावाखाली आहेत. नवी मुंबईत साडे आठ लाख मतदार आहेत, मीरा भाईंदरमध्येदेखील भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक झालाय”, असं भाजप पदाधिकारी म्हणाला.
‘कल्याणच्या जागेसाठी वाटाघाटी…’
“तुमच्या दोन आमदाराच्या जीवावर साटेलोट्याचं राजकारण करत असताना मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे, आम्ही आज महायुतीमधील घटक आहोत. पण त्यांच्या पुत्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कल्याणच्या जागेसाठी ज्या वाटाघाटी केलेल्या आहेत, उबाठा गटाने त्या ठिकाणी किरकोळ उमेदवार दिला, त्या ठिकाणी साटेलोटाचं राजकारण केलं. तिथे प्रचार न करता त्यांचा मुलगा निवडून आला पाहिजे. म्हणून त्याची परतपेड करण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली”, असा आरोप भाजप पदाधिकाऱ्याने केला. “नरेश म्हस्के नावाचा कार्यकर्ता, ते महापौर जरी असले तरी त्यांचं त्यांच्या वॉर्डाच्या बाहेर काहीच चालत नाही”, असंदेखील संबंधित कार्यकर्ता पुढे म्हणाला.
“आम्ही आज एवढंच सांगू इच्छितो, महायुतीबाबत काय निर्णय घ्यायचं ते आमचे नेते निर्णय घेतील. मात्र सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे की, आम्ही कशासाठी त्यांचा प्रचार करायचा? कशासाठी त्यांच्या चिन्हाचा वापर करायचा?”, असे सवाल भाजप पदाधिकाऱ्याने केले.
या आरोपांमुळे एकनाथ शिंदे यांचं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत कल्याणच्या जागेसाठी खरंच डील झालंय का? असा प्रश्न निर्माण झालाय.