डोंबिवली : एमएमआरडीएच्या माध्यमातून डोंबिवलीतील काँक्रिट रस्त्यांची कामे रद्द करण्याचा स्पष्ट आदेश देणारे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदेच असल्याचा गौप्यस्फोट आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला. शिंदे हेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केला. याबाबत शिंदे यांनी काढलेल्या आदेशाच्या प्रतीच माध्यम प्रतिनिधींसमोर पुरावे म्हणून त्यांनी सादर केल्या. त्यामुळं एकनाथ शिंदे याबाबत काय खुलासा करतात याकडे लक्ष वेधले आहे.
आमदार चव्हाण यांनी सांगितले की, भाजपा सरकारमध्ये राज्यमंत्री असताना डोंबिवलीत दर्जेदार रस्ते व्हावेत म्हणून एमएमआरडीएच्या माध्यमातून काम करावे अशी संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मी डोंबिवलीचा आमदार या नात्याने सर्वप्रथम मांडली. या मागणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला तात्काळ मान्यता दिली. केडीएमसीपेक्षा एमएमआरडीए अधिक चांगल्या प्रकारे रस्ते बांधणी करेल असेही ठरले. या कामासाठी 470.82 कोटी रुपये मंजूर झाले, त्यातून डोंबिवलीतील 34 रस्ते काँक्रिटीकरण करण्याचे निश्चित झाले. रस्त्यांचा हा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी एमएमआरडीएने सुमारे 9 कोटी रुपये खर्च केला असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.
30 रस्त्यांची कामे रद्द, अधिकारी वर्ग दबावाखाली …
आमदार चव्हाण पुढे म्हणाले की मी गेले दोन- अडीच वर्षे याबाबत पाठपुरावा करत होतो. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची “सहन होत नाही व सांगता येत नाही ” अशी देहबोली स्पष्ट दिसत होती. अधिकारी वर्ग याबाबत प्रचंड दबावाखाली होते. प्राधिकरणाच्या तर्फे 30 रस्ते कामे रद्द करण्यात आल्याचे खासगीत सांगत होते. जेव्हा कागदपत्रे प्राप्त झाली तेव्हा लक्षात आले की ही डोंबिवलीच्या विकासात खरा अडथळा निर्माण करण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या आदेशानेच होत आहे.
विकास कामामध्ये झारीतील शुक्राचार्याचे काम
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना गेली 25 वर्षे सत्तेत आहे. आजपर्यंत महापालिकेच्या 5 सार्वत्रिक निवडणूका झाल्या. या निवडणुकांमध्ये शिवसेना व भाजपा एकत्र व विरोधात अशी राजकीय लढाई लढलो. पण भाजपाने शहर विकासाबाबत कायमच सकारात्मक भूमिकाच निभावली. उलट शिवसेनेनं स्थानिक पातळीवरील भाजपा कार्यकर्त्यांच्या, नगरसेवकांच्या कामाला शिवसेनेने कायम खोडा घातला. राज्याच्या आणि देशाच्या निवडणुकांमध्ये युतीत इतके वर्ष लढूनही शिवसेनेचे ठाण्याचे नेतृत्व कल्याण डोंबिवलीत विकास कामामध्ये झारीतील शुक्राचार्याचे काम करत होते असा आरोपही आमदार चव्हाण यांनी केला.
भाजप नगरसेवकाच्या फायली दाबून ठेवल्या
भाजप नगरसेवकांच्या फायली महापालिकेत दाबून ठेवणे, भाजपा आमदारांच्या फायली आयुक्तांवर, प्राधिकरण प्रमुखांवर दबाव टाकून निगेटिव्ह करणे, चांगल्या कंत्राटदारांना महापालिकेत येऊच न देणे हे मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच महापालिकांमध्ये सर्रास सुरु आहे. या विरोधात आम्ही आमच्या पातळीवर संघर्ष करतच असतो असेही चव्हाण यांनी सांगितले. स्वार्थी हेतूने शहराच्या विकासात अडथळा टाकण्याचं काम गेल्या 20 वर्षापासून शिवसेना करत आहे हे मुंबई, ठाणे व कल्याण डोंबिवलीकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसेच कामे रद्द केल्याने शासनाच्या पैशांचा चुराडा तर झालाच आहे पण डोंबिवलीकर चांगल्या रस्त्यांपासून वंचित ठेवल्याचे पाप एकनाथरावांनी केले आहे. डोंबिवलीकर जनता हे लक्षात ठेवेल असेही आमदार चव्हाण यांनी सांगितले.