मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले. उध्दव ठाकरेंची मुख्यमंत्री पदावरील संधीसाधूपणा ते कोवीड घोटाळयातील खिचडी शवबॅगा मुंबईतील रस्त्यातील घोटाळा अस सगळचं काढलं. रक्ताचं नातं सांगणा-यांनीच बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटलाय त्यांची बांधिलकी फक्त पैशाशी आहे अशी जहरी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला तुम्ही कधीच मूठमाती दिलेली आहे. हिंदुत्वाशी बेईमानी तुम्ही केलेली आहे. कधी काँग्रेस, कधी समाजवादी आता पुढे एमआयएमसोबत युती करतील. पुढे हमासशी युती करतील, अशी टीका शिंदे यांनी ठाकरेंवर केली.
शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे सेनेचा दुसरा दसरा मेळावा आझाद मैदानात घेण्यात आला यावेळी राज्यातील विविध भागातून शिवसैनिक मेळाव्यास उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार भाषण केले. मैदानाच्या कुरघोडीवरून रंगलेल्या वादाचा धागा पकडून शिंदे म्हणाले. मी शिवतीर्थावर दसरा मेळावा करू शकलो असतो, पण राज्यात कायदा-सुवव्यस्था राखणं हे मुख्यमंत्री म्हणून माझं कर्तव्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आझाद मैदानात आझाद मेळावा आहे. आझाद मैदानात ऐतिहासीक पार्श्वभूमी आहे. मैदान नाही, विचार महत्त्वाचा आहे. जिथे बाळासाहेबांचे विचार, तेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. उध्दव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरून बोलताना शिंदे म्हणाले की, २००४ सालापासून त्यांना ही इच्छा होती. पण जुगाड काही लागत नव्हता. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार त्यांना पालखीत बसवणार असा बाळासाहेबांना मी शब्द दिलाय. पण कोणाला? आम्ही विचार करत होतो. परंतु हे महाशय विधानसभेच्या निवडणुकीनंतर लगेच टूनकण उडी मारली आणि तिकडे खुर्चीवर जाऊन बसले. सगळं सोडून दिलं. मागचं पुढचं सगळं दिलं. त्यानंतर म्हणाले मला कुठे व्हायचं मुख्यमंत्री, पण पवार साहेबांनी सांगितलं. मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी पवार साहेबांकडे दोन माणसं पाठवली आणि ठाकरेंच्या नावाची शिफारस करण्याची विनंती केली. यांच्या एका चेह-याच्या मागे अनेक चेहरे लपलेले आहेत. पोटात एक, ओठात एक असं आमचं काम नाही. मी शेवटपर्यंत कळू दिलं नाही. आणि तीच आपली कमाल आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. हे मुख्यमंत्री बनण्यासाठी संधीसाधू बनले, असा आरोप त्यांनी केला.
शिंदे म्हणाले, बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार गमावला. इतर आमदार आणि खासदारांनी त्यांची लोकप्रतिनिधीत्व गमावलं. तरीही देखील बाळासाहेबांनी आपल्या हिंदुत्वाचे विचार सोडले नाही. पण रक्तचं नातं सांगणाऱ्यांनीच बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटलाय. त्यांची बांधिलकी फक्त पैशांशी आहे, अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली. ज्या काँग्रेसचे बाळासाहेबांनी वाभाडे काढले त्यांचे गोडवे आज गायले जातायत. ज्या मणिशंकर अय्यर यांना बाळासाहेबांनी जोडे मारले त्याच काँग्रेसचे जोडे आज हे उचलतायत, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. न्यायालयाने धनुष्यबाण आपल्याला दिल्यानंतर यांनी शिवसेनेच्या खात्यातले 50 कोटी बँकेकडे मागितले. नंतर त्यांनी ते पत्र आपल्याला पाठवलं. मी क्षणाचाही विलंब न करता ते पैसे त्यांना द्यायला सांगितले, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. यांना खोके पुरत नाहीत. यांना कंटेनर लागतात. याचा साक्षीदार माझ्याशिवाय दुसरा कोण असू शकतो, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवतीर्थावरील मेळावा दसरा मेळावा नाही तो शिमगा आहे. वर्षभर शिंदे, मोदींच्या नावाने शिमगा सुरू असतो.आताही तिथे टोमणे सुरू असतील, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. मुख्यमंत्री झालो तरी मी कार्यकर्ता होतो, आहे आणि उद्याही असेन. इथे आलेल्या प्रत्येकाला मी माझा मुख्यमंत्री समजतो. मुख्यमंत्रीपद ही तुमची मक्तेदारी, मालकी नाही, असंही त्यांनी म्हटलं.
मंत्री अब्दुल सत्तार शिवसैनिकांमध्ये
मंत्री अब्दुल सत्तार हे एसटी बसने शिवसैनिकांसोबत मेळाव्यात उपस्थित राहिले. मात्र व्यासपीठावर न बसता त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये बसून सभा ऐकली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतूक केले. मी सुद्धा असाच बाळासाहेबांच्या सभेत समोर बसायचो.बाळासाहेबांचे विचार मैदानात बसून ऐकणारा शिवसैनिक आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय, असंही शिंदे म्हणाले. या सभेच्या व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची ठेवण्यात आली आहे. व्यासपीठाच्या शेजारी बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे मोठ मोठे कटआऊट्स लावण्यात आले होते.
देशाची जनता INDIA या दहा तोंडी रावणाचं दहन करेल
तुम्ही जे जे बंद केलं ते आम्ही सुरू करतोय, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकारने काय केलं हे सांगितलं. एक रूपयात पीक विमा देणारं हे राज्यातील पहिलं सरकार आहे. एमसीएलला मिळणा-या नफ्यांपैकी 50 टक्के नफा शेतक-यांना मिळणार, असं त्यांनी म्हटलं. मोदीजींमुळे अर्थववस्था सुधारली. आता एक ट्रिलीयन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष्य आहे. नरेंद्र मोदी आपला एकही प्रस्ताव नाकारत नाहीत, असंही त्यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितलं. यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना तयार केलाय. त्यांनी आपल्या पोटदुखीवर तिथे उपचार करावा, असा टोला लगावताना या देशाची जनता INDIA या दहा तोंडी रावणाचं दहन करेल, असं त्यांनी म्हटलं.
छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो आरक्षण देणार…; शिंदेंचे मराठा समाजाला वचन
मराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर दसरा मेळव्यात मोठं वक्तव्य केलं. शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की मी मराठा आरक्षण देणारच, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दसरा मेळाव्यात दिला. . कुणावरही अन्याय न करता. कुणाचंही आरक्षण काढून न घेता. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणारं. एकनाथ शिंदेंच्या रक्तात शेवटचा थेंब असेपर्यंत मी मराठा समाजासाठी लढणार, सर्व समाजबांधव आपले आहेत. मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने, शपथ घेऊन, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सांगतो. मी मराठा समाजाला आरक्षण देणार, असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयासमोर जाऊन नतमस्तक झाले. त्यावेळी शिवसैनिकांनी मोठा जयघोष केला.