ठाणे – प्रत्येक सणाला पोलीस आपले कर्तव्य करत रस्त्यावर दक्ष असतात म्हणून आपण आनंदाने आणि सुखाने दिवाळी साजरी करू शकतो, वाहतूक पोलिसांच्या याच कर्तव्यभावनेची जाण राखून नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे शहर वाहतूक पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली.

ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गजबजलेला चौक म्हणून ओळख असलेल्या तीन हात नाका येथील वाहतूक नियंत्रण कार्यालयात आज एक वेगळाच माहौल पहायला मिळाला. महिला आणि पुरुष वाहतूक पोलीस आणि अधिकारी मोठ्या आनंदात आणि उत्साहात सहभागी झाले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी खास दिवाळीच्या निमित्ताने खास वाहतूक पोलिसांची भेट घेऊन त्यांना फराळ आणि मिठाईचे वाटप केले. वाहतूक पोलीस दिवसरात्र शहरातील वाहतुकीची व्यवस्था पाहण्यासाठी काम करतात. दिवाळीसह प्रत्येक सणाला आपल्या कुटूंबापासून दूर राहून कर्तव्य बजावतात त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेण्यासाठी आज पाडव्याच्या निमित्ताने याठिकाणी आलो असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

पोलिसांनी कधीही कोणतीही मागणी केली तर ती पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री शिंदे हे कायमच तत्पर असतात. यावेळीही आम्ही त्यांच्याकडे शहरात सीसीटीव्ही लावण्याची केलेली मागणी देखील त्यांच्या पाठपुराव्यामुळे तत्परतेने पूर्ण झाली असल्याचे ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. गृह विभागाने ठाणे पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव स्वीकारून तत्काळ निधी मंजूर केल्याने ठाण्यात सीसीटीव्ही लावण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फराळ भरवत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबत बसून फराळ घेतला. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्या सोबत फटाकेही फोडले. यावेळी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग, वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, ठाणे वाहतूक पोलिसांचे ब्रँड अंबेसिडर अभिनेते मंगेश देसाई, उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!