दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १० दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने न्यायालयात १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. दिल्लीतल्या राऊज एव्हेन्यू कोर्टात केजरीवाल यांना हजर करण्यात आलं होतं. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना काल, गुरुवारी दोन तासांच्या चौकशीअंती ईडीने अटक केली.
ईडीने गुरुवारी रात्री केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानावर छापा टाकून त्यांना अटक केली. रात्री उशिरा केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानी सुमारे 4 तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर ईडीचे पथक त्यांना सोबत घेऊन गेले. दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीची ही 16वी अटक आहे. मुख्यमंत्र्यांना पदावर असताना अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे.
ईडीने दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी दुपारी राऊज अव्हेन्यू कोर्टातील विशेष सीबीआय न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू झाली. केजरीवाल यांची चौकशी करण्यासाठी ईडीने कोर्टाकडे 10 दिवसांची रिमांड मागितली.