मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर तर शिंदे च्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. दोन्ही गटाकडून जोरदार तयारी सुरू असून, मेळाव्याचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझर मधून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे दसऱ्या पूर्वीच टीझर टीझर वॉर रांगल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना (ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे) चे दसरा मेळावे स्वतंत्र होत आहेत. शिवतीर्थ आणि दसरा मेळावा हे शिवसेनेचे समीकरण बनल आहे. त्यामुळे गेल्यावर्षी दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान मिळावे, यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. अखेर मुंबई महापालिकेने ठाकरेंना शिवतीर्थ मैदानात सभा घेण्याची परवानगी दिली. यावर्षी ही शिंदे सेनेने शिवतीर्थावर परवानगीसाठी पालिकेकडे दावा केला होता. शिवतीर्थावरून दोन्ही गटात लढाई जुंपली असतानाच शिंदेंच्या सेनेने माघार घेतल्याने यंदाही ठाकरेंचा मेळावा शिवतीर्थावर होणार आहे.
मेळाव्यासाठी रामलीला गुंडाळणार ..
शिंदेंच्या सेनेचा आझाद मैदानात मेळावा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आझाद मैदानावर साहित्य कला मंच आणि महाराष्ट्र रामलीला मंडळ या दोन संस्थांतर्फे रामलीला कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात आल आहे मात्र दसरा मेळाव्यामुळे रामलीला आयोजकांचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागणार आहे. राजकीय दबाव वाढत असल्याने रामलीला कार्यक्रम आदल्या दिवशीच गुंडाळण्याची वेळ येणार आहे.
टीझरमधून कुरघोडी …
ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्यासाठी टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरच्या माध्यमातून एकमेकांवर कुरघोडी करण्यात आली आहे. शिंदे सेनेने जारी केलेल्या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आणि हिंदुत्वाच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचा ऑडिओही यात जोडला आहे. तसेच बेधडक घणाघाती शब्द मांडणाऱ्या, व्यंगचित्रातून बुरखा फाडणारे, हिंदवी अभिमान बाळगणाऱ्या, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा… असा उल्लेख करण्यात आला आहे. तर ठाकरेंच्या सेनेकडून एकच पक्ष, एकच विचार, एकच मैदान! धगधगत्या मशालीचा धगधगता विचार अशा शब्दांत प्रत्युत्तर देण्यात आले आहे.