मुंबई, दि. ८ः 
मुंबईसह राज्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका सोमवारी विधिमंडळाच्या कामकाजाला बसला. बहुंताश आमदार यावेळी अनुपस्थित राहिल्याने परिषदेचे कामकाज अवघ्या अडीच तासांत गुंडाळले. दरम्यान, विधानसभा आणि परिषदेतील समन्वयाचा अभाव यावेळी दिसून आला. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील यासंदर्भातील खंत बोलून दाखवली.

मुंबईसह ठाणे, पालघर आदी आजूबाजूच्या जिल्ह्यांना रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सोमवारीही पावसाची धुवॉंधार बॅटींग सुरू राहिल्याने मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हटली जाणारी रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णतः कोलमडून पडली. मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्या त्यात अडकल्या. घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसला. लोकप्रतिनिधींना देखील यातून मार्ग काढताना, दिव्य कष्ट करावे लागले. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांनी तर रेल्वे पटरीवर उतरावे लागले. पावसाळी अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीच अनेक आमदारांची यावेळी अनुपस्थिती होती. परिणामी विधान परिषदेचे कामकाज अवघ्या अडीच तासांत आटोपले.

विधान परिषदेच्या विशेष आणि विधानसभेच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. विधानसभेचे कामकाज सुरुवात होताच कोरम अभावी दोन तासांसाठी तहकूब करण्यात आले. दुसरीकडे विधान परिषदेचे कामकाज सुरूच ठेवल्याने शेकापचे नेते जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. विधानसभेचे कामकाज थांबवले असताना विधान परिषदेचे कामकाज सुरू ठेवल्यास जनमाणसात वेगळा संदेश जाईल. परिषदेचे कामकाज तातडीने थांबवा, अशी मागणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली. उपसभापतींनी त्यावर उत्तर देताना, सभागृह चालवायचे कि बंद करायचे यासंदर्भात अध्यक्षांकडून निरोप मिळाला नाही. नियोजित वेळेत कामकाज सुरू ठेवण्यासाठी मी सभागृहात आले. दरम्यान, दोन्ही सभागृहात समन्वय किती आहे, हे प्रत्येकजण जाणतो, असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली. तसेच मंत्र्यांनी मुंबईसह राज्यातील पावसाच्या स्थितीसंदर्भात निवेदन करावे, अशी सूचना केली. मंत्री दीपक केसरकर यांनी पावसाची स्थितीचा आढावा दिला. परिषदेचे कामकाज त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

असे झाले परिषदेचे कामकाज 
विधान परिषदेच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता सुरुवात झाल्यानंतर प्रवीण दरेकर आणि सचिन अहीर यांनी अर्थसंकल्पावर भूमिका मांडली. दुपारी १२ वाजता तारांकित प्रश्नोत्तराचा तासाचे कामकाज, निरंजन डावखरे आणि ज. मो. अभ्यंकर या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी व कागदपत्रे पटलावर ठेवले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *