मुंबई, दि. २८ मार्च : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार असल्याचे चित्र देशात आहे. या पराभवाच्या भितीने भाजपाला ग्रासले असून त्याच भितीतून ते विरोधी पक्षांच्या विरोधात षडयंत्र करत आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई ही राजकीय सुडबुद्धीतून केलेली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.​

गोंदियामध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, रामटेक मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले असले तरी घाबरण्याचे कारण नाही, काँग्रेस पक्षाने त्या मतदारसंघात दुसरा अर्ज आधीच दाखल केलेला आहे. परंतु भारतीय जनता पक्ष घाबरलेला असून ते खालच्या पातळीवरचे राजकारण करत आहेत. स्वाभाविक आहे की सत्तेतून बाहेर जाण्याची भिती भाजपाला सतावत असल्याने अशा प्रकाराचे राजकारण ते करत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली तर शिवसेनेचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना ईडीने नोटीस पाठवली, हे सर्व प्रकार पराभवाच्या मानसिकतेतून विरोधी पक्षांची मुस्कटदाबी करण्यासाठी भाजपा करत आहे.

भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष व त्यांच्या पक्षाचे स्वयंघोषीत विश्वगुरू असतानाही भारतीय जनता पक्षाकडे निवडणुक लढवण्यालाठी उमेदवारही नाहीत. भाजपाला दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करावे लागत आहेत त्यामुळे ४०० पारच्या घोषणा पोकळ आहेत हे स्पष्ट दिसत आहे. भाजपाने १० वर्षात देशाची बरबादी केली, जाती-धर्मामध्ये वाद लावले, देशाला व जनतेला आर्थिक कमजोर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान संपवण्याचे काम भाजपा करत आहे, त्यामुळे त्यांना सत्तेतून बाहेर जावे लागेल आणि जनता जनार्दनच भाजपला इंगा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!