मुंबई : पुण्यातील ससून रूग्णालयातून फरार झालेला ड्रग माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केली. या प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
३ जून २०२३ पासून पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील २ ऑक्टोबर २०२३ रोजी रुग्णालयातून पळला. गेल्या १५ दिवसांपासून ललित पाटील हा फरार झाला होता पोलिस त्याच्या मागावर असतानाच अखेर मुंबई पोलिसांनी चेन्नईमधून अटक केली. त्यानंतर त्याला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मी पळालो नाही, मला पळवलं गेलंय : ललित पाटील
ललित पाटील पोलिसांच्या गाडीत बसण्याआधी तो म्हणाला की, मी लवकरच पत्रकारांशी बोलणार आहे. त्यानंतर, त्याला रुग्णालयात नेले जात असताना, मी ससूनमधून पळून गेलो नाही. मला पळवलं गेलंय. मला पळवण्यामागे कोणा-कोणाचा हात आहे हे लवकरच सांगणार आहे , असंही ललित पाटील म्हणाला. त्याच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा संशय निर्माण झाला आहे. या प्ररकणाला राजकीय वळण लागल्याने ललित पाटील कोणाची नावं घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एक मोठं ड्रग्जचं जाळं बाहेर येईल : फडणवीस
आता ललित पाटील हातात आला आहे. त्यातून निश्चितपणे एक मोठं ड्रग्जचं जाळं बाहेर येईल. काही गोष्टी ज्या मला आत्ता समजल्या आहेत त्या मी लगेच माध्यमांना सांगू शकत नाही. मी योग्यवेळी सांगेन. पण एवढंच सांगतो की, या कारवाईतून आम्ही एक मोठं ड्रग्जचं जाळं उघड करू. यामुळे अनेकांची तोंडं बंद होणार आहेत अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.
दादा भुसे, शंभुराज देसाईंची नार्को टेस्ट करा : सुषमा अंधारे
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोप करताना म्हणाले की, या प्रकरणात राजकीय लोक आहेत. मंत्री दादा भुसे, शंभुराज देसाई यांची नार्को टेस्ट करा, असे अंधारे यांनी मागणी केली. ‘राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे ललित पाटीलचा जय सिंघानिया होऊ नये, असा टोला देखील अंधारे यांनी लगावला. अंधारेंच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाशी आमचा संबध नाही : शंभुराज देसाई
दरम्यान सुषमा अंधारे यांनी केलेले सर्व आरोप उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी फेटाळून लावले आहेत. अंधारे यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे. ललित पाटील प्रकरणाशी माझा तीळ मात्र ही संबंध नाही. त्यामुळे बेजबाबदार वक्तव्य करुन त्या समाजात माझी प्रतिमा खराब करण्याचे काम करीत आहेत. माझ्या कायदेशीर सल्लागारांशी चर्चा करुन पुढची कायदेशीर कारवाई करणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले. दरम्यान आम्हांला (दादा भुसे आणि मला) बदनाम करण्याचे काम तात्काळ अंधारेंनी थांबवावे असेही मंत्री देसाईंनी स्पष्ट केले. त्यांचावर लवकरच माझ्या कायदेशीर सल्लागारांशी चर्चा करुन पुढची कायदेशीर कारवाई करणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले. तर अंधारे यांना प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आरोप करायचे असेल तर त्यांचा बोलविता धनी कोण आहे? त्यांना या प्रमुख विषयावरील लक्ष विचलीत करायचं आहे. मात्र, या प्रकरणातील तपासातून सर्व गोष्टी समोर येतील, असे दादा भुसे पुढे म्हणाले.
खरा मास्टरमाईंड कोण? : नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोल यांनी या प्रकरणावरून सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र एक सुसंस्कृत व प्रगत राज्य असून महाराष्ट्राच्या नाव लौकीकाला काळीमा फासण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. राज्यात मागील काही दिवसांत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. एवढा मोठा ड्रग्जचा धंदा राजकीय आशिर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाही. ड्रगच्या काळ्या धंद्यातील ललीत पाटील हा एक प्यादा आहे, या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण ? त्याचा शोध लागला पाहिजे पटोले यांनी केली आहे. या सर्व प्रकरणाचा छडा लागला पाहिजे. ड्रग्जच्या काळ्या धंद्याला कोणाचा आशिर्वाद आहे ? ललीत पाटीलच्या मागे कोणती शक्ती काम करत आहे? हे उघड झाले पाहिजे असे पटोले म्हणाले.