नागपूर : राज्यातील मंदिरांमध्ये वस्त्र संहिता (ड्रेस कोड) लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे. नागपुरातील मंदिरात याची सुरुवात शुक्रवारपासून करण्यात आली. नागपूरमधील चार मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू झाली आहे. यामध्ये श्री गोपालकृष्ण मंदिर, धंतोली, श्री संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर, बेलोरी (ता. सावनेर), श्री बृहस्पती मंदिर, कानोलीबारा, श्री दुर्गामाता मंदिर हिलटॉप या मंदिराचा समावेश आहे.अशी माहिती महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली. त्यामुळे तोकडे कपडे घालून मंदिरात येणा-यांवर बंदी असणार आहे.
जळगाव येथे फेब्रुवारी महिन्यात तीनशेहून अधिक मंदिर पदाधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेची बैठक झाली. यामध्ये मंदिराचा निधी, शासनाकडे मंदिरे स्वाधीन करणे आदी विषयांवर चर्चा झाली. मंदिराचे पावित्र्य टिकविले गेले पाहिजे. ही भूमिका डोळ्यासमोर ठेऊन वस्त्र संहिता लागू करण्यात आली. देशातील अनेक मंदिरांमध्ये पूर्वी पासूनच वस्त्र संहिता लागू आहे. तामिळनाडूमध्ये उच्च न्यायालयाने वस्त्र संहिता लागू करण्याचे आदेश दिले होते. ही प्रक्रिया जागृतीची आणि प्रबोधनाची आहे, असेही सुनील घनवट यांनी नमूद केले. राज्य शासनाच्या ताब्यात असलेल्या मंदिरात हा निर्णय लागू करावा अशी विनंती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना करण्यात येणार असल्याचे घनवट यांनी सांगितले. .