मुंबई: जेजे रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागातील मानद प्राध्यापक डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा राज्य सरकारने मंजूर केला आहे. त्या ठिकाणी तात्काळ नवीन नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
जेजे रुग्णालयातील प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ जेजे रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सक विभागातील डॉक्टर, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख विद्यार्थ्यांना त्रास देतात त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपानंतर डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिनी पारेख यांच्यासह 9 डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे टाकले होते. याप्रकरणावर तात्याराव लहाने यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडत त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते. यानंतर आता सरकारने त्यांनी दिलेला राजीनामा मंजूर केला आहे.
जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला. जेजे रुग्णालयातील ७५० निवासी डॉक्टर संपावर गेले आहे. वरिष्ठ डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्यावर निवासी डॉक्टरांनी अनेक गंभीर आरोप केलेत. विद्यार्थ्यांच्या या आरोपानंतर 9 डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे दिले. डॉ लहाने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी त्यांनी आमचा आणि जेजे रुग्णालयाशी संबंध नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ‘एकतर्फी बाजू ऐकून घेत रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडून गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमची चौकशी करा अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान राजीनामा मंजूर केल्यानंतर तात्याराव लहाने यांनी सांगितले की, ‘मी राजीनामा देत सरकारला मंजूर करण्याबाबत विनंती केली होती. सरकारने माझा राजीनामा मंजूर केला आहे. याबद्दल शासनाचा आभारी आहे. सरकारने लहाने यांचा राजीनामा मंजूर केल्याने आता निवासी डॉक्टरांचा संप मिटेल का ? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.