नवी मुंबई, दि. ३ : अष्टपैलू प्रशासकीय अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज कोकण विभाग महसूल आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. रायगड जिल्हाधिकारी पदावरुन ते पदान्नतीने कोकण आयुक्त या पदावर नियुक्त झाले आहेत. भारतीय प्रशासन सेवेतील 2007 बॅचचे डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कामगार आयुक्त म्हणूनही काम केले आहे, ठाणे जिल्हाधिकारी असताना डॉ. कल्याणकर यांचा दोनदा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव करण्यात आला होता.
ठाणे, रायगड, चंद्रपूर आणि अकोला सारख्या संवेदनशील जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी या पदावर वैशिष्ट्यपूर्ण काम करुन प्रशासनात त्यांनी आपल्या उत्कृष्ट दर्जाच्या कामाचा ठसा उमटवला आहे. डॉ. कल्याणकर यांचा जन्म 10 एप्रिल 1968 झाला असून त्यांनी एलएलएम आणि व्यवस्थापन शास्त्रात डॉक्टरेट पूर्ण केले आहे. सन 2008 ते 2010 या कालावधीत डॉ. कल्याणकर यांनी माजी मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहिले आहे. 2014 मध्ये अकोला महानगरपालिका आयुक्त असताना “हरित अकोला” तसेच अतिक्रमण हटाव मोहिम राबविल्या आहेत. 2015 मध्ये नागपूर येथे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे व्यवस्थापक पद, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद, अशा महत्त्वाच्या पदांवर काम करुन डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आपल्या कामातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वच्छ भारत मिशनसाठी पुढाकार, विदर्भातील बल्लारपूर तालुका हागणदारी मुक्त करणे अशा वैशिष्ट्यपूर्ण कामांमुळे डॉ. महेंद्र कल्याणकर यांना शासनामार्फत नेहमीच गौरविण्यात आले आहे.
यशवंत पंचायत राज पुरस्कार योजनेत ब्रम्हपुरी पंचायत समितीने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते डॉ. कल्याणकर यांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणासाठी मिशन नवचेतना पंचायत राज सशक्तीकरण अभियान, कातकरी उत्थान योजना, जलपरिषद, जलयुक्त शिवार, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी यापूर्वी कोकणातील ठाणे आणि रायगड या जिल्हयांमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे तसेच तत्काकलीन कोकण महसूल आयुक्तांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त असलेल्या आयुक्त पदाचा अतिरीक्त कार्यभार ही सांभाळला आहे. त्यामुळे त्यांच्या एकंदर वैशिष्ट्यपूर्ण कारकिर्दीचा उपयोग कोकण विभागातील नवनवीन उपक्रम, शासनामार्फत जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, विकास कामांना पूर्ण करण्यासाठी होईल अशी अपेक्ष सर्वक्षेत्रांतून व्यक्त केली जात आहे.
———–
[…] डॉ.महेंद्र कल्याणकरांनी स्वीकारली वि… […]