कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे (भाप्रसे) यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या जागी डॉ इंदुराणी जाखड (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जाखड या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत. दांगडे यांच्याकडून त्वरीत पदभार स्वीकारण्यात यावा तसेच पुढील आदेश मिळेपर्यंत सध्याच्या व्यवस्थापकीय संचालक माविम मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळावा असेही राज्य शासनाचे अप्पर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
तसेच श्रीधर दुबे (भाप्रसे) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, रायगड यांची व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ भाऊसाहेब दांगडे यांची १२ जूलै २०२२ रोजी केडीएमसीच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र अवघ्या दीड वर्षानंतर दांडगे यांची बदली करण्यात आली आहे. दांगडे यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे. दांडगे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे जवळचे अधिकारी म्हणून ओळखले जायचे. सध्या केडीएमसीत प्रशासकीय राजवट आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीपर्यंत दांडगे हे केडीएमसीत आयुक्त पदावर राहतील अशीही चर्चा ऐकायला मिळत होती. मात्र त्यापूर्वीच त्यांची बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेची मुदत १२ नोव्हेंबर २०२० रोजी संपुष्टात आली आहे. करोना संकटामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या. त्यानंतर अजूनही निवडणूका होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. नगरसेवक नसल्याने कामे रखडल्याचा आरोपही केला जात आहे. त्यामुळे नव्या आयुक्तांपुढं शहर स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, फेरीवाले, वाढती अनधिकृत बांधकामे, रस्ते आदीं प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागणार आहे.