डॉ दिपक अमरापूरकर यांच्या मृत्यूचा चौकशी अहवाल

मुंबई महापालिका क्षेत्रात दि. २९ ऑगस्ट २०१७ रोजी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान ‘मॅनहोल’ मध्ये पडून डॉ. दीपक अमरापूरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. डॉ. अमरापूरकर यांच्या दुर्दैवी मृत्युबाबत महापालिका आयुक्तांच्या १ सप्टेंबर २०१७ रोजीच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या तीन सदस्यीय समिती मध्ये उपायुक्त (सुधार) चंद्रशेखर चोरे व संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) विनोद चिठोरे यांचा समावेश होता. या चौकशी समितीचा अहवाल महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना सादर करण्यात आला.

काय आहेत अहवालातील ठळक मुद्दे

मुंबईमध्ये, विशेषत: ‘जी / दक्षिण’ विभागामध्ये दि. २९ ऑगस्ट २०१७ रोजी अतिवृष्टी झाली होती. सदर दिवशी ‘जी / दक्षिण’ विभागात ३२० मीमी पावसाची नोंद झाली होती. तसेच त्या दिवशी अष्टमीची भरती होती. त्यामुळे भरती व ओहोटी यांच्या पातळीमध्ये फक्त ०.८८ मीटर एवढाच फरक असल्याने ‘जी / दक्षिण’ विभागासह महापालिका क्षेत्रातील काही भागात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती उद्भवली होती.
सदर दिवशी अष्टमीच्या भरतीमुळे क्लिवलँड पर्जन्यजल उदंचन केंद्राचे दरवाजे जवळपास १४ तास बंद ठेवावे लागले, ज्यामुळे ‘जी / दक्षिण’ विभागातील पर्जन्यजलाचा निचरा होण्यास विलंब झाला.
पर्जन्यजल वाहिन्या खात्याचे कर्मचारी आणि ‘जी / दक्षिण’ विभाग कार्यालयातील कर्मचारी हे पूर परिस्थितीच्या व झाडे कोसळण्याच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कार्यरत होते. जी / दक्षिण विभागातील काही ठिकाणी तसेच वरळी – वांद्रे सी लिंक जवळ पाणी साठल्याने वाहतूकीस निर्माण झालेला अडथळा दूर करण्यासाठी कर्मचारी सदर ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या कामात गुंतले होते.
जी / दक्षिण विभागातील पर्जन्यजल वाहिन्यांच्या कामाशी संबंधित असलेल्या कर्मचा-यांच्या निवेदनावरुन असे दिसून येते की, शंकर लक्ष्मण मटकर मार्गावरील ज्या मॅनहोल मध्ये डॉ. अमरापूरकर पडले, ते मॅनहोल महापालिका कर्मचा-यांनी उघडले नव्हते.
पोलिस खाते व शंकर लक्ष्मण मटकर मार्गावरील दुकानदारांकडून प्राप्त झालेल्या सी.सी.टि.व्ही. चित्रफीतीवरुन असा निष्कर्ष निघतो की, ४ – ६ लोकांच्या जमावाने ते मॅनहोल उघडले होते. तसेच सदर मॅनहोल बंद न करता हा जमाव जागेवरुन निघून गेला.
या बाबतीत पोलीस खात्याने पुढील चौकशी व संबंधितांवर योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे.

अहवालातील शिफारशी

चौकशी समितीचे असे स्पष्ट मत आहे की, मॅनहोलच्या झाकणाच्या ५ इंच ते ६ इंच खाली एक जाळीदार झाकण बसवावे, जेणेकरुन जर मॅनहोलचे झाकण उघडे राहिले तरी त्यातून पाण्याचा निचरा होईल व जीवीतहानी होणार नाही.
उघड्या मॅनहोलमध्ये कोणी व्यक्ती पडू नये, तसेच परिरक्षणादी कामे सुद्धा सुरळीतपणे करता यावीत; या दृष्टीने प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) व प्रमुख अभियंता (मलनि:सारण प्रचालने) यांनी विविध स्रोतांकडून प्राप्त सुचनांचा अभ्यास करुन योग्य ती उपाययोजना निवडावी.
प्लास्टिक, थर्मेाकोल, कपडे, लाकूड यांसारखा कचरा विविक्षित ठिकाणी टाकण्याऐवजी अनेकदा नागरिकांद्वारे इतस्तत: टाकला जातो. हा कचरा पावसाच्या पाण्याने वाहून पर्जन्यजलवाहिन्यांमध्ये जातो. परिणामी पर्जन्यजल वाहिन्या तसेच पर्जन्यजल उदंचन केंद्राच्या जाळ्यांमध्ये सदर कचरा अडकून या वाहिन्या व उंदचन केंद्रांमधून व्यवस्थितपणे पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी तुंबते.
याअनुषंगाने पर्जन्यजल वाहिन्या व उदंचन केंद्रांवरील यंत्रसामुग्री सुरक्षित रहावी व त्यांचे कार्य सुरळीतपणे चालावे, याकरिता संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) यांनी सर्व पर्जन्यजल उदंचन केंद्रांमधील जाळ्या स्वच्छ करण्यासाठी स्वयंचलित यांत्रिक सफाई यंत्रणा बसविण्याबाबतची कार्यवाही करावी; जेणेकरुन पूरपरिस्थितीमध्ये पर्जन्यजल केंद्रांची कार्यक्षमता वाढेल,
ज्या ठिकाणी सदर दुर्दैवी घडना घडली, त्या परिसराच्या जवळच फीतवाला लेन येथील ८० मीटर लांबीचे पर्जन्यजल वाहिनीचे मंजूर झालेले काम प्राधान्याने हाती घेण्यात यावे.
ज्या रस्त्यांवर २ ते ३ फूट पाणी साचले असेल अशा रस्त्यांवरुन चालणा-या नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच पर्यायी सुरक्षित मार्गांचा वापर करण्याबाबतच्या सूचना देण्यासाठी पोलीस खात्याला विनंती करण्यात यावी, जेणेकरुन अशा दुर्घटना टाळता येतील.
पाणी भरण्याच्या ठिकाणांच्या जवळ असलेल्या रहिवाशी व दुकानदार यांना अनधिकृतरित्या उघडल्या जाणा-या मॅनहोल विषयी सचेत करण्यात यावे, तसेच जर कोणी नागरिक अशा रितीने मॅनहोल उघडत असेल तर त्याची सूचना त्वरीत महानगरपालिकेला देण्याबाबत सांगण्यात यावे. या प्रकारचा संदेश प्रमुख अधिकारी (आपत्ती व्यवस्थापन) यांच्याद्वारे प्रत्येक पावसाळ्याअगोदर जाहिरातींच्याद्वारे जनप्रबोधन करण्यात यावे.

हवामान खात्यालाही केल्या सुचना

हवामान खात्याद्वारे वर्तविण्यात येणारे अंदाज हे अनेकदा परिमाणवाचक  व क्षेत्र-तपशिल विरहित असतात; तसेच ते ढोबळमानाने वर्तविलेले असतात. यामुळे आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी ही अनेकदा गरजेपेक्षा खूप जास्त  किंवा कमी  केल्या जाण्याचा धोका असतो. या बाबी लक्षात घेऊन हवामान खात्याने आपले अंदाज हे अधिक ‘स्थल – काल – प्रमाण’ सापेक्ष वर्तवावेत, ज्यामुळे याबाबत आवश्यक ती आपत्ती व्यवस्थापनविषयक पूर्वतयारी योग्य प्रकारे करणे शक्य होईल. हवामान खाते हवामानाच्या अनुषंगाने जे अंदाज वर्तवते, त्यामध्ये मुंबई व कोकण यासाठी एकत्रित अंदाज वर्तवते; त्याऐवजी त्यांनी मुंबईसाठी वेगळा अंदाज वर्तवावा. मुंबईसाठी अंदाज वर्तविताना त्यामध्ये देखील मुंबईतील ठिकाणे किंवा क्षेत्र निहाय अंदाज असल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेच्या व हिताच्या दृष्टीकोनातून योग्य ती उपाययोजना करणे शक्य होईल सदर अंदाजामध्ये पावसाचे प्रमाण, कालावधी, तीव्रता याबाबत ठिकाणनिहाय वस्तुनिष्ठ अंदाज हवामान खात्याकडून मिळाल्यास, आपत्ती व्यवस्थापन विषयक पूर्वतयारी अधिक परिणामकारकपणे करता येऊ शकेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *