डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक २०२० पर्यत पूर्ण करणार : मुख्यमंत्री
इंदू मिल येथे स्मारकाच्या जागेची मुख्यमंत्रयाकडून पाहणी
मुंबई : इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट देऊन पाहणी केली. जगाला आवडेल असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार असून 14 एप्रिल 2020 पर्यंत ते पूर्ण करण्यात येईल. 2019 पर्यंत स्मारकाचे काम दृष्य स्वरुपात दिसेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भाई गिरकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान, स्मारकाचे वास्तू विशारद शशी प्रभू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समितीचे सचिव नागसेन कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक स्तरावरचे भव्यदिव्य असे स्मारक या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला स्मारकाच्या उंचीमुळे या भव्य स्मारकांचे वांद्रे वरळी सी लींकवरून देखील दर्शन घेता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठीच्या सर्व परवानग्या मिळविण्यात आल्या आहेत. स्मारकाचे काम कालबध्द पध्दतीने होण्याबाबतचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.