मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला देशभरातून लाखो अनुयायी मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर येतात. या अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने मंगळवार-बुधवारी मध्यरात्री विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण-परळ आणि पनवेल-कुर्ला स्थानकांदरम्यान १२ विशेष लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मध्य रात्री चालविण्यात येणाऱ्या विशेष गाड्या या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.
मेन लाईनवर विशेष फेऱ्या
मध्य रेल्वेच्या मेन लाईवर परळ-कल्याण अप मार्गावर मध्यरात्री पावणे एक वाजता कुर्ला-परळ विशेष लोकल सुटणार आहे. तर कल्याण-परळ विशेष कल्याण येथून १ वाजता सुटेल आणि परळ येथे मध्यरात्री २.१५ वाजता पोहोचेल.
ठाणे- परळ विशेष गाडी ठाणे येथून मध्यरात्री २.१० वाजता सुटणार आहे. तर परळ येथे २.५५ वाजता पोहोचेल.
परळ-कल्याण डाऊन मार्गावर पहिली विशेष परळ-ठाणे लोकल परळ येथून १.१५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे १.५५ वाजता पोहोचेल.
परळ- कल्याण विशेष लोकल परळ येथून २.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ३.४० वाजता पोहोचेल. परळ-कुर्ला विशेष लोकल परळ येथून ३.०५ वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ३.२० वाजता पोहोचेल.
हार्बर मार्गावर विशेष फेऱ्या
हार्बर अप मार्गावर वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशी येथून १.३० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे २.१० वाजता पोहोचेल.
पनवेल- कुर्ला विशेष गाडी पनवेल येथून १.४० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे २.४५ वाजता पोहोचेल. वाशी-कुर्ला विशेष गाडी वाशी येथून ३.१० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ३.४० वाजता पोहोचेल. डाऊन मार्गावर कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्ला येथून २.३० वाजता सुटेल आणि वाशी येथे ३ वाजता पोहोचेल.
कुर्ला-पनवेल विशेष लोकल कुर्ला येथून ३ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ४ वाजता पोहोचेल. कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्ला येथून ४ वाजता सुटेल आणि वाशी येथे ४.३५ वाजता पोहोचणार आहे.