डोंबिवली, १२ ऑक्टोबर : मध्य रेल्वेला जास्तीत जास्त महसुली उत्पन्न देणारं रेल्वेस्थानक म्हणून डोंबिवली रेल्वेस्थानकाची ओळख आहे. राज्यात जी अतिस्मार्ट रेल्वेस्थानक होणार आहेत त्यामध्येही डोंबिवलीच नांव आहे. डोंबिवलीतून मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या खूप मोठी आहे.

प्रवासी वाहतूक तर लाखोंची असून यामध्ये महिला वर्गाची संख्या फार मोठी आहे. रेल्वेच्या फायद्याचे असं हे स्थानक असूनही रेल्वे प्रशासन मात्र सुविधांच्या बाबतीत दुर्लक्ष करीत आहे. गेले वर्षभर फलाट क्रमांक पाच वरून प्रवास करतांना महिला प्रवाश्यांची तारांबळ होत आहे. फलाट क्रमांक ५ मुंबई दिशेला शेड नसल्याने ऊन-पाऊसात अतोनात त्रास होत आहे.

ऑक्टोबर हिट जाणवू लागली असून उकड्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळ नंतर होणाऱ्या उकड्यात फलाटावर तिरपे ऊन येते. फलाट पाच नंबरवर मुंबई दिशेकडे पत्राशेड नसल्याने फार त्रास प्रवाश्यांना होत आहे. महिलांचे डब्बे आणि फस्टक्लास प्रवाश्यांची गैरसोय झाली आहे. तसेच गाडी आणि फलाटमधील अंतर जास्त असल्याने चढतांना-उतरतांना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. शेड नसल्याने उन्हामुळे काही वेळा प्रवाश्यांना चक्कर येऊन त्रास होत आहे. पावसाळ्यात अशाच पद्धतीचा त्रास पत्राशेड नसल्याने होत होता. त्यावेळीही झोपलेल्या रेल्वे प्रशासनाला जागे करण्यात आले होते. मात्र आजपर्यंत या प्रशासनाची झोप उडाली नाही. परिणामी रेल्वे प्रवाश्यांना याचा त्रास होत आहे.

रेल्वे स्थानकात जी विकासकामे चालू आहेत ती सुद्धा धीम्या गतीने होत आहेत. वर्षानुवर्षे कामे सुरू असून स्थानकात धुळीचे साम्राज्य होत असते. पूर्व व पश्चिम बाजूस असलेले सरकतेजीने जास्त वेळा नादुरुस्त असतात त्यामुळे महिला व जेष्ठ नागरिकांना जिने चढतांना दमछाक होते. चांगली स्वच्छतागृह नसल्याने महिला प्रवाश्यांची कुचंबणा होत आहे. जी स्वच्छतागृह आहेत त्याच्याजवळच गर्दुल्यांनी आपले बस्तान बसविले असल्याच्या तक्रारी महिला प्रवासी करीत आहेत. याबाबतची तक्रार महिला प्रवाशांनी युवासेना सचिव दीपेश म्हात्रे तसेच भाजपा जनसंपर्क कार्यालय, काही लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली आहे.

डोंबिवली रेल्वेस्टेशन फलाट क्रमांक ५ वर मुंबई दिशेला महिलांचा डब्बा जेथे येतो तेथे पत्राशेड नाही. पावसाळ्यातही महिलांचे हाल झाले. आत्ता ऑक्टोबर हिटचा त्रासही गाडीची वाट पाहताना होत आहे. रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देईल का अशी विचारणा महिला प्रवासी पल्लवी शिंदे यांनी केली आहे.

याबाबत उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ सरचिटणीस लता अरगडे यांनी सांगितले की, याविषयी रेल्वे प्रशासनाबरोबर मिटिंग झाली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, तो फलाट परिसर अरुंद असल्याने तेथे पत्राशेड बांधकाम करता येणार नाही. मग जर पत्राशेड करता येत नव्हती तर गाडी पुढे नेऊन थांबविण्याची घाई का केली. त्यांनी आधी सर्व्हे करायला पाहिजे होता. आता आमच्या महिला प्रवाश्यांनी आयुष्यभर उन्हात, पाण्यात, पावसात तसंच उभं राहायचं का ? हे चुकीचं आहे, ज्यांनी हा निर्णय घेतला आणि प्रस्ताव पाठविला त्याबाबत डिआरएमने खुलासा करावा.

याबाबत डोंबिवली रेल्वे स्थानक महाव्यवस्थापक एस. के. अगरवाल यांनी सांगितले की, पूर्वी १२ व १५ डब्यांच्या गाड्यांसाठी वेगवेगळे स्टॉप होते. परंतु आता 15 डब्यांच्या गाड्यांमुळे एकच स्टॉप आहे आणि तो पुढे नेण्यात आला आहे. फलाटवर शेडचं काम सुरू होणार आहे. त्या जागेचा सर्व्हे झाला आहे. आता कधी होतो ते पाहू ? डिआरएम ऑफिस याकडे लक्ष ठेवून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!