डोंबिवली, ५ जुलै : पावसाळा सुरू झाला की रस्त्यात खड्डे आणि खड्ड्यात रस्ते हे डोंबिवली शहरासाठी नवीन नाही. आज जरी काही प्रमाणात सिमेंट काँक्रिटिकरण माध्यमातून रस्ते होत असले तरी रस्त्यातील खड्ड्यांची कमतरता नाही. आता खड्डे हा प्रकार करदात्यांना अंगवळणी पडला असता तरी आता कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे आता डोंबिवली नजदीक खंबालपाडा अंबरविस्ता रस्त्यातून जातांना नागरिकांना चिखल-माती तुडवीत जावे लागत आहे. स्मार्ट सिटीच्या वल्गना करणाऱ्या कडोंमपा प्रशासनाकडे निधी नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. आता शहरातील रस्त्यांसाठी केवळ एमएमआरडीए लक्ष देणार की त्यांच्याकडूनही फक्त वलग्ना होणार अशी विचारणा डोंबिवलीकर करीत आहेत.
पूर्वेकडील खंबाळपाडा अंबरविस्ता डीपी रस्ता येथील यमदूत असल्याची अवस्था आहे. सदर रस्त्यावर झालेल्या दोन अपघातानंतरही प्रशासन लक्ष देत नाही. गेली दोन वर्ष जीव धोक्यात टाकून वाहने चालवावी लागत असल्याने अपघातात जीव गेल्यावर रस्ता होईल का असा प्रश्न आता संतप्त रहिवासी विचारत आहेत.
पूर्वेकडील खंबाळपाडा येथील मॉडेल महाविद्यालयाजवळील अंबरविस्ता, मंगलमूर्ती आणि सर्वोदय या इमारतीसमोरील डीपी मंजूर रस्ता दोन वर्षापासून रखडला आहे. घरे खरेदी करताना विकासकाने रस्ता तयार होईल असे आश्वासन रहिवाशांना दिले होते. मात्र येथील रस्त्यावर दोन अपघात होऊनही विकासक आणि प्रशासनाक्डून रस्त्या झाला नाही असे रहिवाशांचे म्हणणे आहे. रस्त्यावर पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचत असून शाळकरी विद्यार्थी व ज्येष्ठ नागरीकांना रस्त्यावरून चालतांना कठीण होत आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे समाज्य पसरल्याने रिक्षाचालक या रस्त्यावरून जाण्यास नकार देतात. दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात. येथील रहिवाशांनी मंजूर रस्ता कधी होणार असे प्रशासनाला विचारले होते. मात्र वेळकाढू भूमिका निभावीत पालिका प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप लोक करीत आहेत.
याविषयी स्थानिक नागरीक संदीप चौधरी म्हणाले, घर घेताना विकासकाने रस्ता करून देतो असे आश्वासन दिले होते. मात्र दोन वर्ष उलटली तरी रस्ता झाला नाही. तर दीपक चव्हाण म्हणाले, विकासाने घर देताना रस्त्या करून देऊ असे सांगितले होते. माजी नगसेवक साई शेलार यांच्या प्रयत्नाने या खडकाळ मातीच्या रस्त्यावर पथदिवे लावण्यात आले होते. आम्ही सातत्याने रस्त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. पुढील दिवाळीपर्यत रस्ता होईल असे आश्वासन प्रशासनाकडून दिले जात आहे. अंबरविस्ता ते भोईरवाडी पर्यत लहानमुले, ज्येष्ठ व्यक्ती यांना रस्त्यातून चालताना त्रास होत असतो. कच्चा स्वरूपाचा रस्त्या करून देतो असे सांगतात. उन्हाळ्यात पालिकेच्या संबधित विभागाने पाहणी केली होती. रस्त्यावर चिखल झाल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते. रस्त्यावर चिखल आणि खड्डेच खड्डे असल्याने वाहन चालविताना बैलगाडी चालवीत असल्यासारखे वाटते असे वाहनचालक सांगतात.
पावसाळ्यापूर्वी पालिकेच्या अधिकाऱ्यांना भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक साई शेलार यांसह पदाधिकारी राजू शेख यांनी या रस्त्याची पाहणी केली होती. दोन –तीन महिन्यात रस्ता होईल असे आश्वासन देण्यात आले होते. या रस्त्यावर दोन अपघात झाले असून अजून किती अपघात झल्यावर हा रस्त्या होऊल असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
याबाबत पालिकेचे कार्यकारी अभियंता विनय विसपुते यांना विचारले असता ते म्हणाले. हा रस्ता डीपी प्लॅन येत असून त्याचे रुंदी २४ मीटर आहे. या रस्त्याचे काँक्रीटकरण होणार असून ते काम एमएमआरडीएच्या माध्यमातून केले जाणार आहे. पालिकेला एवढा मोठा निधी खर्च करणे शक्य नसल्याने शहरातील मुख्य डीपी प्लॅनमधील रस्ते एमएमआरडीएचा करत आहे. हा रस्ता एमएमआरडीएच्या माध्यमातून लवकरच होणार आहे.