डोंबिवलीजवळील लोढा हेवन परिसरात १२ तास बत्ती गुल
डोंबिवली :- नजीक लोढा हेवन परिसरात महावितरणच्या धिम्या कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसात रात्री उजेडी वीज गुल होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या आणि वीज बिलांची शंभर टक्के वसुली केल्या जाणाऱ्या लोढा हेवनमध्ये १२ तास वीज पुरवठा खंडीत झाल्याने येथील रहिवासी प्रचंड संतापले होते. या प्रकारचा जाब विचारण्यासाठी येथील काही नागरिक पूर्वेकडील महावितरण कंपनीच्या कार्यालयात गेले असता त्यांना एकही अधिकारी जागेवर नसल्याने नागरिकांनी महावितरणाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केला.
नवीन केबल टाकण्यासाठी महावितरण कंपनीने रात्री ९ वाजता वीज पुरवठा खंडित केला होता. मात्र एन उन्हाळ्यात वीज नसल्याने नागरिकांचे खूपच हाल झाले. रात्रभर वीज न आल्याने अखेर सकाळी नागरिकांनी डोंबिवली पूर्वेकडील वीजवितरण कंपनीच्या कार्यालयात गेले होते. मात्र याठिकाणी उत्तरे देण्यासाठी एकही अधिकारी उपस्थित नसल्याने रहिवाशी प्रचंड संतापले होते. यावेळी रहिवाशी रमेश मोरे म्हणाले , काही ठिकाणी केबल खराब आहे तर काही ठिकाणी फिडर यामुळे दुरुस्तीचे काम चालू आहे. मात्र दुरूस्तीसाठी मेंटेनन्सची कामे केली जात नाहीत. त्यामुळे एखादा फॉल्ट झाल्यास तो दुरुस्त करण्यात संपूर्ण दिवस घालवला जातो. वीजपुरवठाबाबत विद्युत अधिका-यांना विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देतायेत. अखेर इथले नगरसेवक प्रभाकर जाधव, सामाजिक कार्यकर्ते रमेश मोरे, किरण सावंत, विठ्ठल शिंदे, तुषार जाधव हे महावितरणच्या कार्यालयात चौकशी गेले तर तिथले सर्व अधिकारी सुट्टीवर गेल्याचं सांगितलं. वीजमंडळाच्या या लपंडावामुळे लोढा हेवनमधील जनता मात्र त्रस्त झाली आहे. जेव्हा लाईट बिल वेळेवर भरला जात नाही त्यावेळी मिटर कापण्यासाठी महावितरणचे अधिकारी वेळेवर येऊन मिटर कापतात. मग केबल्सच्या दुरूस्तीची कामे वेळेवर कशी केली जात नाहीत, असा सवालहि रहिवाश्यांनी उपस्थित केला.