वॉटर, मीटर, गटरमध्ये अडकले लोकप्रतिनिधी : डोंबिवलीकरांनी सर्वपक्षीयांना धरले धारेवर
प्रशासनाची परिसंवादाकडे पाठ
डोंबिवली : महापालिका रूग्णालयातील आरोग्य सेवेचा ढीसाळ कारभार, अनधिकृत बांधकामाचा विळखा, रस्त्यांची दुरावस्था, प्रशासनातील वाढता भ्रष्टाचार आदी समस्यांवरून डोंबिवलीकरांनी सर्वपक्षीयांना चांगलच धारेवर धरलं. लोकप्रतिनिधी केवळ वॉटर, मीटर आणि गटरमध्ये अडकून पडल्याचा संतापही नागरिकांनी व्यक्त केला, केडीएमसीच्या सत्तेच्या द्विवर्षपुर्तीनिमित्त आयोजित परिसंवादात नागरिकांनी या समस्या मांडल्या. परिसवांदाच्या कार्यक्रमाला प्रशासनातील एकही अधिकारी उपस्थित राहिला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कारभाराविषयी डोंबिवलीकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिवसेना भाजपच्या सत्तेला दोन वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीनं डोंबिवलीच्या बालभवन येथे पंचनामा शहर विकासाचा या विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नागरिकांनी आणि पत्रकारांनी विविध समस्या मांडल्या. महापालिका रूग्णालयातील बेशिस्त कारभार त्यातील सेायी सुविधांचा अभाव हा मुद्दा नागरिकांनी प्रकर्षाने मांडला. प्रशासनातील भ्रष्टाचारावरही नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला. वॉटर मीटर आणि गटार या सुविधेपलिकडे लोकप्रतिनिधी विचार करीत नसल्याची नाराजीही अनेकांनी व्यक्त केली. २७ गावे स्वतंत्र करा असाही मुद्दा नागरिकांनी मांडला. अनधिकृत बांधकामामुळे करदात्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यावरील खड्डयांमुळे नागरिक हैराण झाले आहेत असे अनेक विषयावर नागरिकांनी सर्वपक्षीयांना थेट प्रश्न विचारले. नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देतेवेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे चित्र अनेकवेळा दिसून आले. या परिसंवादात महापौर राजेंद्र देवळेकर उपमहापौर मोरेश्वर भोईर विरोधी पक्षनेते मंदार हळबे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे आदी सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी सत्ताधा-यांनी आपण केलेल्या कामांचा आढावा घेतला. कल्याणातील रूक्मिणीबाई रूग्णालय शासनाकडे वर्ग करण्यासाठी ठराव झाला आहे मात्र शासन पातळीवर कोणताच निर्णय झाला नसल्याचे महापौरांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्रयानी साडेसहा हजार कोटीचे पॅकेज जाहिर केले होते त्याविषयी बोलताना उपमहापौर भोईर यांनी यासंदर्भात विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याने येत्या काही दिवसात ही कामे पाहावयला मिळतील असा विश्वास व्यक्त केला. राज्यात व केंद्रात सेना भाजपची सत्ता असतानाही कल्याण डोंबिवलीतील विकास कामांसाठी निधी आणण्यासाठी सत्ताधारी अपयशी ठरल्याची टीका विरोधी पक्षनेते हळबे यांनी केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पोटे यांनी आघाडी सरकारच्या काळात कल्याण डेांबिवलीत मोठया प्रमाणात निधी आला त्यातून अनेक कामे झाल्याचे सांगितले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हात्रे यांनी अपु-या सोयी सुविधांवरून सत्ताधा-यांवर जोरदार टीका केली. महापालिका आयुक्त पी वेलारासू अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्यासह अनेक अधिका-यांनी परिसंवादाकडे पाठ फिरवली. जनतेच्या प्रश्नाविषयी कोणतचं देण घेण नसल्याचेच यातून स्पष्ट झाल त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर डोंबिवलीकरांनी तीव्र संताप व्यक्त केला.
—————