डोंबिवली : डोंबिवली पश्चिम विष्णूनगर येथील जुने फिशमार्केट जीर्ण अवस्थेत होते तसेच तेथे सांडपाणी प्रकिया प्रकल्पाची व्यवस्था नव्हती व तेथील ड्रेनेज व्यवस्था देखील खराब होती .त्यामुळे आज महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार ह प्रभागाचे अधिकारी राजेश सावंत यांनी जुन्या फिश मार्केटवर महापालिकेचे कर्मचारी, विष्णूनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने निष्कासनाची कारवाई केली.
या फिशमार्केट मधील 54 फिश विक्रेते व 10 मटण विक्रेते यांना जुन्या फिशमार्केट लगतच शेड बांधून तात्पुरत्या स्वरुपात फिशमार्केटची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची देखील गैरसोय होणार नाही. तसेच फिशविक्रेत्यांना देखील व्यवसायाच्या दृष्टीने सोयीचे झाले आहे.नवीन फिशमार्केट एकूण 870 चौरस मीटर जागेवर तयार होणार आहे. हे नविन फिशमार्केट मटण आणि चिकन मार्केटसह बांधण्याचे प्रस्तावित असून या दोनमजली, उद्वाहनाची सुविधा असलेल्या इमारतीत कत्तल खाना आणि सांडपाणी प्रकल्पाची देखील सुविधा उपलब्ध राहिल. नविन फिशमार्केटच्या इमारतीचे बांधकाम मार्च 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे.