रसिक डोंबिवलीकरांनी अनुभवला जलसा… कविता, गाणं आणि नृत्य यांच्या त्रिवेणी मिलाफातून मकरोत्सव रंगतदार 

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सांगितीक मेजवानी 

डोंबिवली : टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या मकरोत्सवाची सांगता कथक – फ्लेमेंको ची जुगलबंदी असणारा “जलसा” कार्यक्रमाने झाली.  कथक आणि फ्लेमेन्को या नृत्यथराराने झाली. तीन दिवस सुरू असलेल्या या मकरोत्सवात कविता गाणं आणि नृत्य या त्रिवेणी मिलाफातून रसिक डोंबिवलीकर तृप्त झाले.

तिसरे पुष्प रविवारी गुंफण्यात आले. सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना आदिती भागवत यांच्या संकल्पनेतुन साकारलेला कथक – फ्लेमेंको ची जुगलबंदी असणारा “जलसा” हा कार्यक्रम पार पडला. जागतिक किर्तीचे फ्लेमेंको नर्तक कुणाल ओम यांनी सर्व रसिकांसाठी नवीन असणाऱ्या फ्लोमेंको या अनोख्या नृत्यप्रकाराने वेगळीच अनुभूती दिली. स्पेनमध्ये स्थायिक होऊन त्यांनी फ्लेमेंको या नृत्यप्रकाराचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. भारतातील एकमेव फ्लेमेंको नर्तक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कुणाल यांनी आदिती भागवत यांच्या कथक सोबत जुगलबंदी सादर केली. तसेच आदिती आणि कुणाल या दोहोंनीही सारंगीवर असणाऱ्या संदिप मिश्रा, तबल्यावर तनय रेगे, पर्कशनवर आदित्य कुडतरकर आणि व्हाॅयलिनवर श्रुती भावे या सहकलाकारांसोबत देखील जुगलबंदी आणि फ्युजन सादर केले. शास्त्रोक्त कथक नृत्याने सुरूवात झालेल्या या नृत्य सोहळ्यात पुढे सॅनोरीटा या गाण्याने मध्यांतर घेण्यात आला आणि मध्यंतरानंतर सुफी नृत्याची छटा सादर करण्यात आली आणि दमा दम मस्त कलंदर या सुफी नृत्याने कार्यक्रमाची आणि पहिल्या मकरोत्सवाची सांगता झाली. प्रथमच फ्लेमेंको या नृत्यप्रकाराचा कथक सारख्या प्राचीन नृत्यप्रकाराशी साधलेल्या मिलाफाचे रसिकांनी विशेष कौतुक केले. शेवटच्या दिवशी मकर सक्रांत असल्याने कुलकर्णी ब्रदर्स डोंबिवली पश्चिम यांच्या तर्फे तिळगूळ तर मंडळातर्फे चाफ्याचे फुल देऊन रसिकांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व प्रायोजक संस्थांचे, सर्व सहभागी कलाकारांचे आणि समस्त डोंबिवलीकर रसिकांचे आभार मंडळाच्या सहकार्यवाह सिद्धी वैद्य यांनी मानले. तर रसिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मंडळाचे अध्यक्ष नंदन दातार यांनी आभार मानले.

“कवितेतील गाणी” या कमलेश भडकमकर यांच्या संकल्पनेतुन पहिले पुष्प गुंफण्यात आलं.  या कार्यक्रमात कवी वैभव जोशी आणि निवेदिका दिप्ती भागवत यांनी अनेक दिग्गज कवींच्या आठवणी सांगत त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या प्रसिद्ध तसेच काही फारश्या प्रसिद्ध न झालेल्या पण खोल गर्भितार्थ असणाऱ्या कविता सादर केल्या. तर ऋषिकेश रानडे, शमिका भिडे आणि मानसी जोशी यांनी आपल्या सुमधूर स्वरात काही निवडक कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. दुसरे पुष्पात स्वरतीर्थ सुधीर फडके अर्थात बाबूजींच्या जन्मशताब्दीवर्षा निमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेल्या, गायलेल्या गीतांचा “देणे नक्षत्रांचे” हा कार्यक्रम पार पडला. नचिकेत देसाई, मंदार आपटे, संचिता गर्गे आणि धनश्री देशपांडे यांनी आपल्या सुरेल आवाजात बाबूजींची अनेक गाणी सादर केली. ज्योती कलश छलके या बाबूजींच्या गीतापासून सुरूवात होऊन स्वर आले दूरूनी, आकाशी झेप घे रे, धुंदी कळ्यांना, धुंद एकांत हा, विठू माऊली तू, प्रथम तुझ पाहता या आणि अशा अनेक गाण्यांनी बहरलेल्या मैफीलीचा शेवट बाबूजींचं स्वप्न असणाऱ्या वीर सावरकर या चित्रपटातील ने मजसी ने, या सावरकरांच्या रचनेने करण्यात आला. दिपाली केळकर यांच्या भावपुर्ण आणि आभ्यासपुर्ण निवेदनाने कार्यक्रमाचा दर्जा आणखीनच उंचावला. विवेक भागवत यांच्या संगीत संयोजनामुळे गाण्यांची रंगत आणखीनच वाढली. सर्व कलाकारांनी समस्त डोंबिवलीकरांच्या वतीने बाबूजींना खऱ्या अर्थाने स्वरांजली अर्पण केली. तीन दिवस सुरू असलेल्या मकरोत्सवाने रसिक डोंबिवलीकरांना सांगितीक मेजवानी मिळाली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *